विद्यापीठाची केशवसुत काव्यस्पर्धा : एक रंगत गेलेली काव्यमैफल

– विशाल नंदागवळी प्रथम, सुबोध धुरंधर द्वितीय, तर वैष्णवी हागोणे तृतीय

अमरावती :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. के. जी. देशमुख सभागृहामध्ये जमलेली तरुणाई … व्यासपीठावरून सादर होणाऱ्या एकापेक्षा एक सरस कविता… बहारदार आणि रंगतदार सूत्रसंचालन… टाळ्यांचा कडकडाट …’ वाहवा ! सुंदर !! क्या बात है !!! ‘चे उत्स्फूर्त उद्गार … अशा जल्लोशात शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे घेण्यात आलेली ‘ कवी केशवसुत काव्यस्पर्धा ‘ एका बहारदार काव्यमैफिलीसारखी रंगतदार होत गेली . तिचे स्वरूप केवळ स्पर्धेचे न राहता एका दर्जेदार कविसंमेलनाचे होत गेले. विद्यापीठाशी संलग्नित, वेगवेगळ्या जिल्ह्यांतील एकूण ६७ महाविद्यालयीन आणि विद्यापीठ विभागांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेचे हे ७ वे वर्ष गाजवले. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे विविध रंग अनुभवायला मिळाले. या वयोगटातील विद्यार्थी केवळ प्रेमाच्याच रंगात भिजत नाहीत, तर त्यांच्या सामाजिक जाणिवा अतिशय प्रगल्भ आणि तीव्र आहेत, याचा प्रत्यय या मैफिलीच्या निमित्ताने आला.

या स्पर्धेत विशाल लक्ष्मण नंदागवळी ( प्रथम क्रमांक ), कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर महाविद्यालय, अकोला, सुबोध प्रेमचंद्र धुरंधर ( द्वितीय क्रमांक ), मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, वैष्णवी संतोष हागोणे (तृतीय क्रमांक ), अकोला विधी महाविद्यालय,अकोला हे विद्यार्थी विजेते ठरले. विजेत्यांसाठी अनुक्रमे रु. २०००, रु.१५००, रु .१००० रोख , सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणून यवतमाळ येथील बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात कार्यरत सहायक प्रा. ज्ञानेश्वर गटकर आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्रात कार्यरत डॉ. भगवान फाळके यांनी फार तटस्थ आणि काटेकोर मूल्यमापन केले.

डॉ . मोना चिमोटे

कविता ही आपल्या अंतःकरणाची भाषा असते.मराठी कवितेला प्राचीन परंपरा असून ती फार संपन्न आहे. तिच्या आकृतीबंधांमध्ये विविधताआहे .या कवितेचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, त्यांच्यात कवितालेखनाची गोडी निर्माण व्हावी ; आणि चांगल्या कविता लिहिणाऱ्यांचे कौतुक व्हावे – हा या स्पर्धेमागील हेतू आहे, असे मनोगत मराठी विभागप्रमुख आणि मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणात व्यक्त केले.

डॉ.तुषार देशमुख

माझे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये झाल्यामुळे माझा कवितेशी थेट संबंध नाही, मात्र माझे वडील शिक्षक होते ; आणि ते मराठी कविता फार सुंदर शिकवत असत. त्यांनी शिकवलेल्या शार्दुलविक्रीडित वृत्तातील काही ओळी अजूनही माझ्या स्मरणात पक्क्या आहेत. कविता ही महत्त्वाची गोष्ट असून ती जीवनात आपल्याला खूप आनंद देते . तसेच ती जीवनाचे भानही देते ,असे मनोगत बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून बोलताना विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी व्यक्त केले.

प्रा.ज्ञानेश्वर गटकर

कवितेमध्ये विचार असतात, मात्र ते भावनेमध्ये मिसळून गेलेले असतात. सर्वच प्रकारच्या जाणिवांचा एक सुंदर गोफ कवितेमध्ये विणलेला असतो . कविता हा साहित्याचा फार श्रेष्ठ प्रकार आहे, असे भाष्य स्पर्धेचे मा. परीक्षक प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी व्यक्त केले.जुन्या -नव्या कवींच्या श्रेष्ठ कविता ऐकवून त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले .

डॉ.भगवान फाळके

चांगली कविता लिहिणे ही एक साधना आहे.मनात माजलेली भावना आणि विचारांची खळबळ जेव्हा सुंदर रूप धारण करते, तेव्हा त्याची कविता होते . कविता करणे हा जीवनावर प्रेम करण्याचाच भाग आहे.आजची पिढी वैयक्तिक भावभावनांमध्ये गुंतून न पडता सामाजिक दुःखाला भिडत आहे ,ही आशादायक गोष्ट आहे, असे स्पर्धेचे मा. परीक्षक डॉ. भगवान फाळके आपल्या मनोगतात म्हणाले .

उद्घाटन सत्र, स्पर्धा आणि बक्षिस वितरण या तिन्ही कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केशवसुत काव्यस्पर्धेचे प्रभारी डॉ . हेमंत खडके यांनी केले .आभार डॉ . प्रणव कोलते यांनी मानले .मराठी विभागप्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे , डॉ. मनोज तायडे, डॉ. माधव पुटवाड, डॉ. प्रणव कोलते आणि विभागाचे विद्यार्थी या सर्वांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात मोलाचे सहकार्य दिले.

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे घटस्फोटित मुलीला मिळाली अनुकंपा नोकरी

Tue Sep 19 , 2023
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे एका घटस्फोटित मुलीला तिच्या वडिलांच्या निधनानंतर मध्य रेल्वेमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. स्मिता थूल असे या महिलेचे नाव असून, वडिलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच दुर्दैवी घटनांचा सामना केल्यानंतर थूल कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेच्या अख्त्यारीत येणाऱ्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पंप ड्रायव्हर म्हणून रामभाऊ थूल नोकरी करायचे. मार्च २०१९ मध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com