नवी दिल्ली :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत केंद्रशासित प्रदेश चंदीगड मधील मनीमाजरा येथे सुमारे 75 कोटी रुपये खर्चून कार्यान्वित करण्यात आलेल्या 24×7 पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन केले.
या प्रकल्पाचा एक लाखाहून अधिक लोकांना फायदा होणार असून 855 एकरांवर पसरलेल्या या वस्तीला आता एकूण लांबी 22 किलोमीटर लांबीच्या नवीन पाइपलाइनद्वारे चोवीस तास पाणी मिळू शकेल, असे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. दोन मोठे जलाशय उभारून चोवीस तास पाणी उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर आता पाणी गळतीचा खर्च ग्राहकांना सोसावा लागणार नाही. याशिवाय, घरात पाणी गळती झाल्यास त्वरित समजेल असे ते म्हणाले. पाण्याचा दाब योग्य राहावा यासाठी व्हीएफडी पंपही बसवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपासून परिसरातील लोकांना एका अत्याधुनिक फिल्टरेशन प्लांटच्या माध्यमातून दिवसाचे 24 तास, वर्षाचे 365 दिवस फिल्टर केलेले पाणी पुरवले जाईल, असे ते म्हणाले.
130 कोटी लोकांनी पुढे टाकलेले एक पाऊल म्हणजे देशाने पुढे टाकलेल्या 130 कोटी पावलांच्या समान असून ही मोदीजींनी घडवून आणलेली किमया आहे, असेही ते म्हणाले. भारताला विकसित भारत बनवण्यासाठी 130 कोटी दृढनिश्चयी लोक कटिबद्ध आहेत आणि आज चंदीगडमध्ये आपण या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे, असे त्यांनी सांगितले.