पौष्टिक आहारासाठी मनपाच्या माध्यमातून दत्तक घेतलेले क्षयरुग्ण ‘निगेटिव्ह’

– क्षयरोग मुक्त भारताकडे वाटचाल : निक्षय मित्रांचा सत्कार

नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येत्या वर्ष २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने नागपूर शहरातील क्षयरुग्णांना पोषण किट देण्यासाठी रुग्णांचे पालकत्व स्वीकारण्याचे मनपाद्वारे आवाहन करण्यात आले होते. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी पुढे येउन क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारले. त्याचेच सकारात्मक परिणाम म्हणजे, मनपाच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी नागरिकांद्वारे दत्तक घेण्यात आलेल्या क्षयरुग्णांचा चाचणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आलेला आहे. यासंबंधी माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मंगळवारी (ता.२८) दिली.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन दिनाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘क्षयरोग मुक्त भारत’ अभियानाच्या अंतर्गत निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी बोलत होते. याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. विजय डोईफोडे, डॉ. ज्ञानशंकर मिश्रा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. सुशांत मेश्राम, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या टी.बी. मुक्त भारत च्या दिशेने वाटचाल करताना नागपूर शहराच्या कार्याची माहिती दिली. नागपूर शहर क्षयरोग मुक्त करण्यासाठी मनपाकडे सक्षम आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले. केंद्र शासनाच्या एका अहवालानुसार बहुतांशी क्षयरुग्ण कुपोषणाच्या विळख्यात असून त्यांना किमान ६ महिने उत्तम पौष्टिक आहार मिळाल्यास ते क्षयरोग मुक्त होउ शकतात. त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सेवाभावी संस्था आणि नागरिकांना क्षयरुग्णांच्या पौष्टिक आहारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. कोव्हिड काळात स्थानांतरीत मजूर, गरीब, गरजूंच्या मदतीसाठी धावून आलेल्या नागपूरकर सेवाभावी नागरिक आणि संस्थांनी या आवाहनालाही उत्तम प्रतिसाद दिल्याचे जोशी यांनी सांगितले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० रुग्णांचे पालकत्व स्वीकारले. याशिवाय सूद फाउंडेशन, प्रगल्भ फाउंडेशन, स्व. प्रभाकरराव दटके फाउंडेशन यासह पगारिया परिवारासारख्या अनेक दात्यांनी पुढाकार घेतला. एकट्या पगारिया परिवाराने तब्बल २५० रुग्णांचे पालकत्व स्वीकारले. पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी क्षयरुग्णांना पौष्टिक आहार देण्यासाठी १५ लाख रुपयांचा आमदार निधी जाहिर केल्याचेही अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले. या सर्वांच्या सहकार्यानेच टी.बी. मुक्त भारताकडे ही वाटचाल यशस्वीरित्या सुरू राहिल व पुढील उर्वरित १७ महिन्यापेक्षा कमी कालावधीत क्षयरोग मुक्त भारत होईल, असा विश्वासही राम जोशी यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी क्षयरोग मुक्तीसाठी लवकर निदान आणि त्वरीत उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. यासाठी आशा सेविकांची भूमिका महत्वाची आहे. आशा सेविकांना वर्षभर अपडेट ठेवणे व त्यांच्याकडे आजारासंबंधी इंत्यभूत माहिती असणे आवश्यक असून त्यादृष्टीने त्यांना वेळोवेळी प्रशिक्षित करण्यात येत असल्याचे सांगितले.

शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार यांनी क्षयरोगाबाबत संपूर्ण बारकावे आणि करावयाचे कार्य प्रास्ताविकात विषद केले. संचालन दिपाली नागरे यांनी केले तर आभार डॉ. विनायक माहेश्वर यांनी मानले.

सेवाभावी संस्था व नागरिकांचा सत्कार

क्षयरुग्णांच्या आरोग्यासाठी त्यांना पौष्टिक आहार किट देण्यासाठी पुढे आलेल्या सेवाभावी नागरिक व संस्थांच्या प्रतिनिधींचा मान्यवरांनी सत्कार केला.

सत्कारमूर्ती : सेवा फाउंडेशन, सहयोग फाउंडेशन, सूद चॅरिटेबल फाउंडेशन (विजय नायडू व सुनीता साळवे), स्व. प्रभाकरराव दटके फाउंडेशन, गरज फाउंडेशन, भास्कर पराते, अपोलो डायस फाउंडेशन, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपंकर भिवगडे, डॉ. विजय तिवारी, डॉ. मेघा जैतवार, डॉ. वसुंधरा भोयर, डॉ. सीमा कडू, डॉ. अंजूम बेग, डॉ. हर्षदा डहाके, सीता गेडाम, प्रिती झरारिया, संगीता खंडाईत, संजय माटे, दिपाली तायडे, डॉ. सरला लाड, साकीद अहमद, निशांत महेश, प्राजक्ता काटोले, मनीषा खोब्रागडे, डॉ. भारती इंगोले, डॉ. रेशमा धिंग्रा, डॉ. विक्की देवगडे.

सर्वाधिक क्षयरुग्ण रेफर करणारे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र : बाबुलखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (डॉ. स्वाती गुप्ता), पाचपावली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (डॉ. भारती इंगोले), कॉटन मार्केट नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र (डॉ. अनुराग मिश्रा)

क्षयरोग जनजागृती स्पर्धेतील विजेते 

चित्रकला स्पर्धा (प्रथम, द्वितीय व तृतीय) : अर्पीत अलोने, रिया कोचे, समिक्षा बागडे.

पोस्टर स्पर्धा (प्रथम, द्वितीय व तृतीय) : रामराज सिंग, मिनल बेलसरे व प्रियंका डोरगे (दोघी द्वितीय), पायल राठोड.

व्हिडिओ : अंकिता बेलखोडे

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com