खेळण्या बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे दुखद : राज्यपालांचा कर्करुग्ण मुलांसाठी संवाद

मुंबई :-जे वय खेळण्या बागडण्याचे आहे, अभ्यास करण्याचे आहे, त्या वयात लहान मुलांना कर्करोगासाठी उपचार घेताना पाहणे क्लेशदायक आहे. अश्या स्थितीत लहान मुलांची व त्यांच्या पालकांची मानसिक स्थिती काय होत असेल याचा अंदाज देखील बांधता येत नाही. मुलांना त्यांचे लहानपण पुन्हा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर कर्करुग्ण मुलांना तसेच त्यांच्या पालकांना टाटा मेमोरियल सेंटर तसेच अशासकीय संस्थांतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.       

टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोग ग्रस्त मुलांनी शनिवारी (दि. १८) आपल्या पालकांसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. लहान मुलांच्या राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरियल सेंटर – इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते.

योग्य व वेळेवर उपचार केल्यास लहान मुले कर्करोगावर पूर्णपणे मात करू शकतात व चांगले जीवन जगू शकतात असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी मुलांना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या इम्पॅक्ट फाउंडेशन व कृष् फाऊंडेशनला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. राज्यपालांशी भेट झाल्यानंतर मुलांनी राजभवनाला भेट दिली.

यावेळी इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश फाउंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्करोग तज्ज्ञ डॉ वेंकट राम मोहन व लहर बच्छावत आदी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com