नागपूर :- महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत, ह्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठीच असतात. जे कार्यकर्ते जिंकून येण्याची क्षमता ठेवतात अशा सर्व कार्यकर्त्यांना या निवडणुकीत तिकीटा देऊन त्यांना जिंकवीण्याचे कार्य पार्टी करेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश बसपाचे अध्यक्ष एड सुनील डोंगरे यांनी कार्यकर्त्यांच्या जनरल मीटिंगमध्ये व्यक्त केले.
काल नागपुरात झालेल्या बसपाच्या प्रदेश कार्यालयातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाच्या दिशा निर्देशानुसार लवकरच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. बहुजन समाज पार्टी स्वबळावर या सर्व निवडणुका लढणार असून नागपुरातील कार्यकर्त्यांच्या तयारीची समीक्षा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष काल नागपूरात आले होते. बसपाचे राज्याचे हेडकॉटर नागपूर असल्याने 26 मे पासून 30 मे पर्यंत स्वतः प्रदेशाध्यक्ष नागपुरात राहून विदर्भातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघाचा आढावा घेतील असेही त्यांनी यावेळी घोषित केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव पृथ्वीराज शेंडे, नागोराव जयकर, मंगेशठाकरे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, नागपूर जिल्हा प्रभारी रंजना ढोरे, जिल्हा महासचिव चंद्रशेखर कांबळे, जिल्हा सचिव अभिलेश वाहाने, माजी मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, उमेश मेश्राम, इब्राहिम टेलर, यशवंत निकोसे, राजू चांदेकर आदिनी याप्रसंगी आपले मनोगतही व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीराज लांजेवार यांनी केले.
याप्रसंगी झालेल्या समीक्षा बैठकीत उमरेड चे पुनेश्वर मोटघरे, प्रिया गोंडाने, रामटेकचे डॉ रायभान डोंगरे, काटोलचे रुपराव नारनवरे, कामठीचे चंद्रगुप्त रंगारी, गेडाम, सावनेरच्या तारा गौरखेडे, पश्चिम नागपूरचे अंकित थूल, मध्य नागपूरचे विलास पाटील, दक्षिण नागपूरचे सहदेव पिल्लेवाण, उत्तर नागपूरचे राजेश नंदेश्वर, हिंगण्याचे राजकुमार बोरकर आदींनी आपापल्या विधानसभेतील कार्याचा आढावा दिला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांची ही प्रथमच जनरल मीटिंग असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी बसपात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष यांनी त्यांना पुष्प व पक्षाचा दुपट्टा देऊन स्वागत केले.
एड राहुल सोनटक्के जिल्हा प्रभारी
वाडी परिसरातील प्रसिद्ध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते एड राहुल सोनटक्के यांचे याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड सुनील डोंगरे यांनी नागपूर जिल्हा प्रभारी म्हणून पुनर्नियुक्ती केली. त्यामुळे सोनटक्के यांचे सर्व प्रदेश, जिल्हा व स्थानिक स्तरावरील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.