चंद्रपूर :- यंदा दीक्षाभुमी सोहळ्याकरीता नागरिकांचा प्रवेश हा चांदा क्लब मार्गे असणार आहे.सोहळ्याप्रसंगी होणाऱ्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यास व कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला असुन स्टॉल्स धारकांनी त्यांचे स्टॉल्स हे चांदा क्लब ग्राऊंडच्या आतच लावण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के, प्रा. दिलीप रामटेके उपस्थित होते.
दीक्षाभुमीत येणाऱ्या अनुयायांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये याकरीता सर्व नागरिकांचा प्रवेश हा यंदा चांदा क्लब मार्फत करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे परिसरात खाद्यपदार्थांचे किंवा इतर विक्रीचे स्टॉल्स मोठया प्रमाणात लागतात. जर ते स्टॉल्स चांदा क्लबच्या आत लागले,तर बऱ्याच प्रमाणात गर्दीवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
या सर्व स्टॉलधारकांना चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्टॉल्सची आखणी करून देण्यात येणार आहे. खाद्यपदार्थ किंवा इतर विक्रीच्या स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने गर्दी नियंत्रणास मदत मिळणार आहे.१३ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्टॉलधारकांना नोंदणी करता येणार असुन नोंदणीसाठी संजय गांधी मार्केट झोन क्र.१ येथे श्याम बोधलकर यांच्याशी ९९६००२७८९६ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. दीक्षाभुमीत येणाऱ्या अनुयायांनी चांदा क्लब मार्गेच प्रवेश करावा व सर्व स्टॉल धारकांनी त्यांचे स्टॉल हे चांदा क्लब ग्राउंड मधेच लावण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.