कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

कोकण भूमी प्रतिष्ठानच्या ‘मी मुंबई अभियान’ अंतर्गत ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाठ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आयोजक संजय यादवराव आदी उपस्थित होते. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.

निसर्गसमृद्ध कोकणाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा महोत्सव असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचे काम केले जात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध आहे. काजू, आंबा, मत्स्यव्यवसाय यांच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोकणचे वैभव जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊनच कोकणासाठी विविध पर्यावरणपूरक योजना, प्रकल्प, उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.”

लहरी हवामानामुळे कोकण किनारपट्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून सावरण्याचे बळ देण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. तरूणांना रोजगार उपलब्ध करून कोकणचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार – उपमुख्यमंत्री फडणवीस

कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

“कोकणातला आंबा अधिक गोड की माणूस” असा प्रश्न पडतो अशा शब्दात कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाचे कौतुक करून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बंदरे, मासेमारी, विविध उद्योग, पर्यटन विकासासह स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा निर्धार आहे” हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्धी आणि विकासासाठी आवश्यक व्यक्तींचे एकत्रित संमेलन असून राज्य शासन कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

काजूसारख्या उत्पादनात कोकणची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे नारळ, मत्स्यपालन, आंबा प्रक्रिया, पर्यटन, वन उत्पादने असे विविध उद्योग हे कोकणचे वैभव असून प्रत्येक जिल्ह्याची गरज ओळखून त्या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले.

प्रारंभी महोत्सवाचे संयोजक आमदार प्रवीण दरेकर तसेच स्वागताध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर यांच्यासह कोकणच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वजातीय पुर्नविवाह परिचय संमेलन संपन्न

Wed Dec 7 , 2022
नागपूर :- सर्वजातीय पुनर्विवाह परिचय संमेलन का आयोजन केदारे मॅरेज ब्युरो की ओर सें विदर्भ साहित्य संमेलन सभागृह मोर भवन में संपन्न हुआ । कार्यक्रम की अध्यक्षता हलबा समाज के वरिष्ठ समाजसेवी गिरीधारी निमजे ने की, जब की सुरेश कुंभारे, अंबादास पराते, और श्याम सोनकुसरे विशेष अतिथी के रूप में उपस्थितीत थे । कार्यक्रम की प्रस्तावना रखते हुए आयोजक भास्कर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com