नायलॉन मांजाची विक्री भोवणार मनपा भरारी पथकांची नजर, कडक कारवाईचे मनपा आयुक्तांचे निर्देश

चंद्रपूर ३१ डिसेंबर – राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे. तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काहीजण नायलॉन मांजाच्या शोधात असतात.त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग,मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असुन दर दिवसाच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे. दरवर्षी तीळ संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे. त्यासाठी महिनाभराआधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरु होते. नायलॉन धागा वापरण्यास बंदी असतांना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळुन येते. याच्या वापराने पशु – पक्षी तसेच नागरीकांना सुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

महापालिकेचे उपद्रव शोधपथक यावर कारवाई करत असुन नायलॉन मांजा बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मनपाच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. बंदीचे उल्लंघन करणार्‍यांवर विक्री केल्यास १० हजारांचा दंड आणि साठा आढळल्यास १ लाखांच्या दंडासह फौजदारी कारवाई आणि साहित्य जप्त केले जाणार आहे. त्यामुळे कुणीही नायलॉन मांजाची विक्री करू नये व नागरीकांनी सुद्धा या मांजाचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com