नागपूर :- विश्वमांगल्य सभा या अखिल भारतीय स्तरावरील मातृसंघटनेला स्थापन होऊन तेरा वर्षे पूर्ण झालेत. या कालावधीमध्ये संघटनेचा खूप मोठा विस्तार झाला. इतर कार्यविभागासह समाजातील आवश्यकतेचा विचार करून मागील वर्षी धर्म संकृती शिक्षा विभाग स्थापन झाला. या विभागाचा उद्देश म्हणजे भारतातील अबाल वृद्ध स्त्री जीवन धर्माधिष्ठित असावे तसेच आपल्या पूर्वापार चालत आलेल्या धार्मिक परंपरांचे चिंतन प्रत्येक भारतीयाने केले पाहिजे, त्याचे वहन देखील केले पाहिजे हा होय.
धर्म संस्कृती शिक्षा विभागाची विदर्भ प्रांताची प्रथम द्विदिवसीय बैठक केंद्रीय कार्यालय नागपूर येथे दिनांक 4 व 5 जून 2023 रोजी संपन्न झाली. यावेळी अखिल भारतीय संघटनमंत्री डॉ. वृषाली जोशी तसेच केंद्रीय परमर्शदाता प्रशांत हरताळकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच धर्मसंस्कृती शिक्षा विभाग अ. भा. सहसंयोजिका डॉ. राधिका कमाविसदार तसेच विदर्भ प्रांत संघटनमंत्री तेजसा जोशी, विदर्भ प्रांत अध्यक्षा मधुरा लेंधे देखील उपस्थित होत्या.
उद्घाटन सत्राचे वेळी प्रशांत हरताळकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आज समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी धर्म या शब्दाची अवहेलना झालेली असे सांगितले. तसेच धर्म व संस्कृती या संकल्पना स्पष्ट केल्यात. हिंदू धर्म हा केवळ भारतापुरता मर्यादित नसून तो वैश्विक आहे, तो नित्य नूतन, सनातन धर्म आहे असे मत स्पष्ट केले.
या द्विदिवसीय बैठकीमध्ये मार्गदर्शन, विचार, विचार विनिमय, मुक्त संवाद होऊन या वर्षात घ्यावयाच्या कार्यक्रमासंदर्भात योजना ठरल्यात.
दिनांक 5 जून रोजी समापन सत्रामध्ये अ.भा. संघटनमंत्री डॉ वृषाली जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून योजना यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी काही महत्त्वपूर्ण दायित्वांच्या घोषणा विदर्भ प्रांत अध्यक्षा मधुरा लेंधे यांनी केल्यात. त्यामध्ये अ.भा. धर्म संस्कृती शिक्षा परीक्षा प्रमुख म्हणून अंजली कोडापे , विदर्भ प्रांत यात्राप्रमुख अपर्णा धोत्रे, सहयात्रा प्रमुख माधवी सदावर्ती, विदर्भ प्रांत सहसंयोजिका श्रीलेखा पातुरकर, नागपूर प्रांत संयोजिका उमा बक्षी, नागपूर प्रांत परीक्षा प्रमुख सीमंतिनी कुलकर्णी, वाशिम जिल्हा प्रशिक्षण प्रमुख सुप्रिया देशमुख, अमरावती जिल्हा संयोजिका सारंगा धर्माधिकारी यांचा समावेश आहे.