
नागपूर :-एखादा कथाकार कथा लिहितो तेव्हा पाहिलेल्या घटनेवर किंव्हा कल्पनेवर आधारित तो कथा लिहितो, पण पूर्वीच लिहिलेल्या कथेवर एखादी घटना तंतोतंत तशीच घडते तेव्हा मात्र विचार करावा लागतो. एखादी घटना अशी अपवादाने घडू शकते. पण अशा चार घटना घडतात तेव्हा पोलीसही आश्चर्य करतात. अशाच घटनेवर आधारित ‘कथाकार’ हे दोन अंकी नाटक आज शनिवारी सादर करण्यात आले.
६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेत हर्ष नागभिडे लिखित आणि दिग्दर्शित हे नाटक इन्स्टिट्यूट आॅफ पिपल्स वेल्फेअर नागपूर तर्फे सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागातर्फे ही स्पर्धा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या नाटकात कुमारची भूमिका रिसीव ढोबळे, तन्मय – हर्ष नागभिडे, अमन – समीर शिंदे, मुन्ना – सौरभ कांबळे, वडील – ऋतिक अमाळकर, आई – ऋतुजा गोमासे आणि मुलगी – सानिया वासनिक यांनी साकारली.
सर्व कलावंतांनी यात चांगली भूमिका केली. सगळ्यांचेच पाठांतर अगदी योग्य असले तरी भाषेच्या शुद्धतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याशिवाय नाटकात संवादफेक आणि पॉज अत्यंत महत्वाचा आहे. त्याचा उपयोग योग्य ठिकाणी व्हायलाच हवा. त्यामुळे प्रसंगांची तीव्रता अधिक ठोसपणे आपण वाढवू शकतो, याचेही भान ठेवले पाहिजे. याशिवाय नाटक छानच झाले.
‘कथाकार’ हे नाटक त्याच्या शीर्षकाप्रमाणेच एका लेखकाने त्याच्या जीवनात लिहिलेल्या चारशे पैकी चार कथांच्या भोवती फिरते. त्याच्या कथांच्या भयानक आशयाबद्दल आणि त्याच्या शहरात तशाच आशयाच्या घडलेल्या लहान मुलांच्या हत्यांबद्दल त्याची तपासणी केली जाते. मुळात त्या घटनांशी त्याचा काहीही संबंध नसतो पण वारंवार त्याला प्रश्न विचारले जातात, त्याला त्रास दिला जातो कारण त्या घटनांचा संबंध त्याच्या कथांशी जोडला जातो. त्या घटना त्याच्या कथांशी तंतोतंत साम्य खातात म्हणून….. पण त्याच्याकडे त्याचा पुरावाही नसतो आणि त्या घटनांशी त्याचा काहीही संबंध नसतो. त्याच्या नावावर फक्त त्याच्या कथा असतात पण त्याचा आत्मविश्वास असतो की तो निर्दोष आहे. त्या लेखकाला मात्र या घटनांबद्दल काहीही माहिती नसतं पण नंतर मात्र यात एक पात्र अचानकपणे समोर येतं अशी या नाटकाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
नाटकाचा सूचक नेपथ्य ऋतिक अमाळकर यांचे होते. संगीत एस. आर. कांबळे यांनी दिले. प्रकाशयोजना चैतन्य दुबे, सागर मुने यांची तर रंगभूषा आणि वेशभूषा ऋतुजा गोमासे आणि साहिल हजारे यांची होती. रंगमंच व्यवस्था पुण्यशील लांबट, निहार तांबे, करुणा मंगदे, शशांक रहांगडाले यांची होती. सतीश काळबांडे यांनी या नाटकाला सहाय्य केले.


