नारी शक्तीच्या माध्यमातूनच विकसित भारताची पुढील वाटचाल – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

– गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

गोंदिया :- संसदेने नारी शक्ती वंदन विधेयक पारीत केले असून यामुळे येत्या काळात संसदेसह राज्यांच्या विधिमंडळांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येणार आहे. या पार्श्वभूमीवर नारीशक्तीच्या सहाय्याने देशाच्या अमृत काळात ठेवण्यात आलेल्या उद्दिष्टाच्या दिशेने विकसित भारताची वाटचाल अधिक मजबुतीने होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे व्यक्त केला.

येथील धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात स्व. मनोहरभाई पटेल यांच्या 118 व्या जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती धनखड बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, सुनील मेंढे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. सी. रमेश, राहूल कृष्णा, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृत काळात म्हणजे २०४७ पर्यंत सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या विकासात महिलांचे मोलाचे योगदान राहणार असल्याचे प्रतिपादित करून उपराष्ट्रपती म्हणाले, दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कर्तव्य पथावर झालेल्या विविध संचलनात महिलांनी केलेल्या नेतृत्वामुळे देश व जगास नारी शक्तीचे अनोखे दर्शन झाले. जानेवारीत संसदेच्या नव्या वास्तूत केंद्र शासनाने ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक पारित करुन राजकीय क्षेत्रात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे येत्या काळात संसदेत व विविध राज्यांच्या विधीमंडळात महिलांचा सहभाग वाढेल व विकसित भारताच्या वाटचालीत त्यांची महत्वाची भूमिका ठरेल.

गेल्या दशकात भारताने वेगाने आर्थिक प्रगती साधत जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून स्थान मिळविले आहे. या प्रगतीतही महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. जर्मनी व जपानला मागे टाकत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही उपराष्ट्रपती धनखड यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र शासनाकडून शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये देण्यात येतात. महाराष्ट्र राज्याने त्यात प्रति शेतकरी अधिकचे ६ हजार रुपये टाकून नमो शेतकरी सन्मान योजना सुरु करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. १ रुपयात पीक विमा देवून राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशासाठी दिशादर्शक कार्य केले असल्याचे गौरवोद्गारही धनखड यांनी काढले.

शिक्षण हे बदलाचे व समाजातील विषमता दूर करण्याचे प्रभावी माध्यम आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मनोहरभाई पटेल यांनी शाळा, महाविद्यालये स्थापन करून जणू शिक्षणाची गंगाच या भागात प्रवाहित केली आहे. मनोहरभाई पटेल यांनी निर्माण केलेला आदर्श कार्याचा वसा गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निष्ठा व प्रामाणिकपणे जपल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटी – मुख्यमंत्री

शिक्षण, सिंचन, उद्योग आदिंच्या माध्यमातून गोंदियाचे सुपूत्र मनोहरभाई पटेल यांनी पश्चिम विदर्भाच्या विकासात मोलाचे योगदान देताना नगर परिषदेपासून ते संसद आणि विधीमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. गोंदिया नगर परिषदेच्या माध्यमातूनही त्यांनी भरीव कार्य केले आहे. या नगर परिषदेचे सुसज्ज भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासन ३० कोटींचा निधी देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शानुसार राज्य शासन गतीने जनहिताचे कार्य करीत आहे. कृषी, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदिंमध्ये राज्य अग्रेसर आहे. राज्य शासनाच्या प्रस्तावांना केंद्राकडूनही मंजुरी मिळून राज्यातील विविध प्रकल्प व योजनांना गती प्राप्त झाली आहे. केंद्र शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला ५ ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था करण्याचे ध्येय ठेवले आहे. यालाच प्रतिसाद देत राज्य शासनानेही यामध्ये राज्याची १ ट्रिलीयन डॉलर्स अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या दृष्टीने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी खासदार प्रफुल पटेल यांनी प्रास्ताविकात गोंदिया-भंडारा भागात मनोहरभाई पटेल यांनी निर्माण केलेले शिक्षणाचे जाळे तसेच कृषी, सिंचन, राजकारण आदी क्षेत्रात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.

यावेळी भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रिडापटू आणि पत्रकारांना गौरविण्यात आले. तसेच संश्रुती चव्हाण, काजल रुखमोडे, दिव्या पहीरे, पर्व अग्रवाल, लक्ष्य अग्रवाल, अस्मिता कोसळकर, मेघा चौरसिया, प्रियांशी राठोड, गार्गी वैरागडे, नंदिनी साठवणे, मेघा मिश्रा, साक्षी खंगार, प्राची लेंडे, हेमंत बघेले, सुरुची मुळे, निधी चौरसिया, मुकेश सुलाखे, विक्रांत ठाकूर, वंशिका कटरे, हर्षिता शर्मा आणि राजा अग्रवाल या विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डॉ. देवाशिष चॅटर्जी आणि राजु हाजी सलाम पटेल यांना सन्मानपत्र देण्यात आले. पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानासाठी अंकुश गुंडावार, मिलिंद हळवे, रवी सपाटे आणि प्रशांत देसाई यांचा सन्मान करण्यात आला. प्रगतिशील शेतकरी दुर्गेश कांबळे आणि शिवाजी गहाणे यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट क्रीडापटू वैष्णवी गभणे आणि मुन्नालाल यादव यांनाही गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र जैन यांनी केले . यावेळी नागरिक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ARMY OPENS SITABULDI FORT ON 11 FEBRUARY 2024

Mon Feb 12 , 2024
Nagpur :- Sitabuldi Fort was opened for public on 11 February 2024, being the second Sunday of the month. Nagpurian came to visit in large numbers and approx 243 persons visited the heritage Fort to know about the Historic legacy. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com