महायुतीचेच सरकार येणार –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

– काँग्रेस नेते रवी राजा, उबाठा चे बाबू दरेकर यांचा भाजपा प्रवेश

नागपूर :- राज्यातील जनतेचा महायुतीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते, ज्येष्ठ काँग्रेस नेते रवी राजा, उबाठा चे उपविभागप्रमुख बाबू दरेकर यांनी त्यांच्या सहका-यांबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमामध्ये फडणवीस बोलत होते. मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, आ. तमिल सेल्वन, आ. पराग शहा, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह, राजेश शिरवडकर आदी यावेळी उपस्थित होते. फडणवीस आणि शेलार यांनी रवी राजा, बाबू दरेकर यांचे आणि त्यांच्या सहका-यांचे भारतीय जनता पार्टीत स्वागत केले. यावेळी रवी राजा यांची भाजपा मुंबई उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आ. शेलार यांनी जाहीर केले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, महापालिका ज्यांनी कार्यकर्तृत्वाच्या बळावर गाजवली असे काँग्रेसचे मातब्बर नेते रवी राजा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला ही अतिशय आनंदाची बाब आहे. 23 वर्षे बेस्ट चे सदस्य म्हणून प्रभावी कामगीरी राजा यांनी बजावली होती. त्यांचा अनुभव, दांडगा जनसंपर्क याचा भारतीय जनता पार्टीला निश्चितच फायदा होणार आहे. राजा यांच्या संपर्कामुळे आगामी काळात काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते भाजपामध्ये प्रवेश करतील असेही फडणवीस यांनी सांगितले. उबाठा चे उपविभागप्रमुख दरेकर यांच्या प्रवेशामुळे भाजपाची घाटकोपर मधील ताकद वाढणार असून त्याचा तेथील उमेदवारांना फायदा होईल असेही त्यांनी नमूद केले.

मुंबई महानगरपालिकेतील जुने स्नेही आणि काँग्रेसचे अभ्यासू नेतृत्व अशी ख्याती असलेल्या राजा यांच्या भाजपा प्रवेशाने सायन कोळीवाडा परिसरात आणि बाबू दरेकर यांच्या प्रवेशामुळे घाटकोपर परिसरात भाजपाची ताकद वाढेल असे  शेलार म्हणाले. काँग्रेस ने आपल्या अनुभवाचा फायदा करून घेतला नाही. आपण कोणत्याही पदाच्या अपेक्षेने भाजपामध्ये आलो नाही. यापुढे भाजपा ची ताकद वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे राजा यांनी सांगितले.

युवक काँग्रेस माजी प्रदेश उपाध्यक्ष अभिषेक सावंत, आशीष राठी, सर्वन्ना रंगस्वामी, आर. के. यादव, सुनील वाघमारे, तबस्सुम शेख या काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

· गोपाळ शेट्टी यांची समजूत काढू

ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचे प्रयत्न चालू असून त्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी महायुतीतील कार्यकर्त्यांनी परस्परांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर काही ठिकाणी पक्षांतर्गत बंडखोरी झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक झाली असून एकमेकांच्या विरोधातील उमेदवार मागे घेण्यात यश मिळेल, असेही त्यांनी नमूद केले .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदीरा गांधी यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

Fri Nov 1 , 2024
नागपूर :- देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आस्थापना उपायुक्त विवेक इलमे, विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com