राज्यपालांच्या हस्ते ‘जीवनाची सुलभता : नागरिकांचा मूलभूत अधिकार’ या विषयावरील परिषदेचे उदघाटन

प्रत्येकाने नागरिक म्हणून कर्तव्य पालन केल्यास जीवनमान उन्नत होईल: राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची सुलभता वाढविण्यासाठी शासनाची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. परंतु, सुशासनासाठी समाजाचा आणि नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. ‘हा देश माझा आहे’ आणि ‘हे शहर माझे आहे’ ही भावना ठेवून प्रत्येकाने नागरी कर्तव्याचे पालन केल्यास एकूणच समाजाचे जीवनमान उन्नत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

इंडियन मर्चंट चेंबरतर्फे आयोजित तिसऱ्या ‘इज ऑफ लिविंग: नागरिकांचा मूलभूत अधिकार’ या विषयावरील परिषदेचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. १९) राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

उदघाटन सत्राला इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, पदनिर्देशित अध्यक्ष डॉ समीर सोमैया, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व ‘आयएमसी – इज ऑफ लिविंग समिती’चे अध्यक्ष एम के चौहान, वरिष्ठ शासकीय व नागरी सेवा अधिकारी तसेच उद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते.

सुशासनासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे असे सांगताना राज्यपालांनी सार्वजनिक हिताच्या कार्यात मुंबईतील दानशूर उद्योजकांनी केलेल्या कार्याची जंत्री सादर केली.

जमशेद जीजीभॉय यांच्या दातृत्वामुळे जे जे हॉस्पिटल निर्माण झाले तर ससून कुटुंबियांमुळे डेव्हिड ससून वाचनालय उभे राहिले. नाना शंकरशेट यांच्या दातृत्वामुळे निर्माण झालेली स्मशानभूमी आजही समाजाला सेवा देत आहे असे सांगून कॉर्पोरेट जगताने महिलांसाठी अधिक स्वच्छतागृहे निर्माण करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

सर्वप्रथम मुंबईतील रस्ते सुधारावे

जनसामान्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील रस्ते सुधारण्याची गरज असल्याचे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले. आपण इतर शहरात जातो, त्या ठिकाणी रस्ते चांगले गुळगुळीत असतात. परंतु इतक्या मोठ्या मुंबईत शहरात, पैश्यांची काही कमी नसून देखील रस्ते चांगले नाहीत याबद्दल राज्यपालांनी खंत व्यक्त केली.

मुंबई शहरात रस्ते सदैव वाहतुकीने भरलेले असतात, लोकल ट्रेनमध्ये गर्दी असते. हा भर कमी होण्यासाठी जलवाहतून सुरु झाली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

देशात ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना येण्यापूर्वीच ‘नया रायपूर’ हे स्मार्ट शहर निर्माण झाले व त्याठिकाणची जीवनमान सुधारले असे त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट रुग्णालयांनी एक दिवस जनता ओपीडी सुरु करावी

आज अनेक कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत. त्यांनी जनसामान्यांसाठी किमान एक दिवस निःशुल्क सेवा दिली तर सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

जीवनस्तर उंचावण्यासाठी नागरिकांची सुरक्षा महत्वाची : विवेक फणसळकर 

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे असे सांगताना नागरिकांनी मूलभूत कर्तव्यांचे पालन केल्यास पोलिसांचेही काम सुलभ होईल असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पोलिसांकडे समाजातील सर्व लोकांकडून वेगवेगळ्या तक्रारी येतात परंतु पोलीस दलाशी संबंधित नसून देखील पोलीस लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये लोक अनेकदा परस्पर सहकार्य करत नाही व तक्रारी पोलिसांपर्यंत येतात या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले. आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे वाढत आहेत तसेच वाढत्या वाहन संख्येमुळे रस्त्यांवरील ताण देखील असह्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी प्रास्ताविक केले तर आयएमसी इज ऑफ लिव्हिंग परिषदेचे अध्यक्ष एम के चौहान यांनी परिषदेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारी, निवेदनांवरील कार्यवाहीसाठीची यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा

Sat May 20 , 2023
मुंबई :- नागरिक आपल्या सूचना व तक्रारी शासनाशी संबंधित विविध समाज माध्यमांतून मांडत असतात. त्यावर तत्काळ कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येत असून ती त्वरित कार्यान्वित करण्याची सूचना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक पार पडली. त्यावेळी मुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com