हास्य, वीर रस कवितांनी रसिक झाले मंत्रमुग्ध 

– गांधीबाग उद्यानात रंगली कवितांची मैफिल

– मनपाच्या अखिल भारतीय कवी संमेलनाला उदंड प्रतिसाद

नागपूर :- देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आणि नागपूर महानगरपालिका गांधीबाग उद्यानाच्या २४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका, लोट्स कल्चरल अँड स्पोर्टींग असोसिएशनच्या वतीने पर्यावरणाला समर्पित अशा अखिल भारतीय कवी संमेलनचे आयोजन करण्यात आले. कवी संमेलनात देशभरातून आलेल्या कवींनी आपल्या हास्य, वीर रस कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

रविवार २५ डिसेंबरच्या गुलाबी थंडीत गांधीबाग उद्यानाच्या दालनात कवी संमेलनाचे उदघाटन नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी माजी महापौर दयाशंकर तिवारी, गांधीबाग झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, माजी आमदार प्रा.अनिल सोले, माजी नगरसेवक सुनिल अग्रवाल, माजी नगरसेविका आभा पांडे यांच्यासह माजी नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

आमंत्रित कवींमध्ये सुरेंद्र यादवेंद्र हास्य रस बरन (राजस्थान),  नंदकिशोर अकेला हास्य रस रतलाम (माळवा) राकेश वर्मा हास्य व्यंग भोपाळ (मध्य प्रदेश),  राम भदावर, वीर रस इटावा (उत्तर प्रदेश), प्रियंका रॉय, गीत गझल, वाराणसी (उत्तर प्रदेश), दमदार बनारसी, बनारस (उत्तर प्रदेश) यांच्यासह कविता रसिक प्रेक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

कवी संमेलना बाबत माहिती देत माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवा निमित्य गांधीबाग उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले होते. उद्यानाच्या पहिल्या वर्धापन दिन 1998 पासून दरवर्षी या दिनाचे औचित्य साधून पर्यावरणाला समर्पित अशा अखिल भारतीय कवी संमेलनचे आयोजन केले जाते. मागील 24 वर्षांपासून या साहित्य यज्ञामध्ये देशातील सुमारे 119 नामवंत कवींनी आपल्या विविध शैलीतील कवी धर्म, संस्कृती, राष्ट्र आणि सामाजिक समस्या समजावून सांगणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले आहेत.

कवी संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. तत्पूर्वी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आपल्या अनोख्या काव्य शैलीतून सर्व आमंत्रित कवींचा परिचय करून दिला. नंतर सूत्रसंचालनाची जबाबदारी हास्य रस कवी दमदार बनारसी यांनी स्वीकारली, त्यांनी आपल्या हास्यात्मक काव्य शैलीने रसिकांना पोट धरून हसण्यास बाध्य केले. वाराणसीवरून आलेल्या प्रियंका रॉय यांनी गीत सादर केले, नंतर नंदकिशोर अकेला यांनी सादर केलेल्या व्यंगात्मक कवितांनी श्रोत्यांमध्ये हास्यांचे वातावरण निर्माण झाले. तर राजस्थान येथून आलेल्या सुरेंद्र यादवेंद्र यांनी आपल्या हास्य व्यंग कवितांनी रसिकांची मने जिंकली. याशिवाय भोपाल मध्यप्रदेशातून आलेल्या राकेश वर्मा यांनी आपल्या हास्य कवितांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. तर उत्तर प्रदेशातील इटावा येथून आलेल्या राम भदावर यांनी आपल्या वीर रस कवितांना वातावरण देशभक्तीमय केले. कवीं सादर केलेल्या प्रत्येक कवितेला रसिकांनी उत्तम दाद दिली. टाळ्याच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या व्यस्ततेतून वेळ काढत राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मनपाच्या अखिल भारतीय कवी संमेलनाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवी संमेलनेचे भरभरून कौतुक करीत, कवींनी सादर केलेल्या प्रत्येक कवितेला उत्तम दाद दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com