मुंबई :- “कामगारांच्या उपजीविकेचे साधन असलेली ठाणे येथील सुपर मॅक्स कंपनी सुरूळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा आठवडाभरात सादर करावा,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.
सुपर मॅक्स कंपनीच्या कामगारांच्य प्रश्नांबाबतची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे झाली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले. बैठकीस कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, आमदार सचिन अहिर, विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, कामगार विभागाचे सहसचिव श.मा.साठे, कामगार आयुक्त सतीश देशमुख, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Image-2024-10-09-at-07.28.28_be3b9ef0.jpg)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कामगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्या, उद्योग वाढवण्याची शासनाची भूमिका आहे. त्यासोबतच सुरू असलेल्या कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांना नियमित वेतन व काम मिळाले पाहिजे, यासाठी शासन आग्रही आहे. त्यामुळे सुपर मॅक्स कंपनी व्यवस्थापनाने पूर्ववत सुरू करावी, कंपनी व्यवस्थापन कामगार हिताला प्राधान्य देत असेल तर व्यवस्थापनाला कंपनी पूर्ववत सुरु करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य शासनस्तरावरून उपलब्ध करून देण्यात येईल. कामगारांचे थकीत वेतन वितरित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाच्या गोठवलेल्या बॅंक खात्यांतील ठेवींबाबत विभागाने संबंधितांकडे पाठपुरावा करावा. कामगारांचा रोजगार कायम रहावा यासाठी कामगार संघटना आणि संबंधित यंत्रणा व्यवस्थापनास सहकार्य करण्यास तयार असल्याच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थपनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव एका आठवड्यात सादर करावा आणि कंपनी सुरू करण्याची भूमिका घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी संबंधितांना दिले.