प्रत्यारोपण केलेल्या दीडशे वर्ष जुन्या वटवृक्षाचा वाढदिवस उत्साहात साजरा

– पर्यावरण दिनी उद्यान विभागाचा पुढाकार

नागपूर :- वर्षभरापूर्वी प्रत्यारोपण करून नवजीवन देण्यात आलेल्या १५० वर्ष जुन्या वटवृक्षाचा आज (सोमवार, ५ जून) पर्यावरणदिनी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वटवृक्षाची सजावट करण्यात आली असून, वटवृक्ष परिसरात सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली होती. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले, नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या या स्तुत्य पुढाकाराबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी उद्यान विभागाचे संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

झाडाचा वाढदिवस साजरा करताना उपायुक्त रवींद्र भेलावे, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान विभागातील कर्मचारी यांच्यासह गोरेवाडा क्षेत्रातील नागरिक विशेषत्वाने उपस्थिती होती. हे वडाचे झाड पुनर्जीवित केल्याबद्दल नागरिकांनी मनपाच्या कार्याचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

मागील वर्षी मे महिन्यामध्ये आलेल्या वादळामुळे मंगळवारी झोन मधील गोरेवाडा तलावाजवळील क्वाटर्स परिसरात असलेले जुने विशाल वडाचे झाड मुळासकट उन्मळून पडले होत. सुमारे दीडशे वर्ष जुन्या आणि १७ फुट विशाल घेर असलेल्या झाडाचे प्रत्यारोपण करून नवजीवन देण्याचा निर्णय उद्यान विभागाद्वारे घेण्यात आला होता. या स्तुत्य आणि कौतुकास्पद कार्यालाही मनपा आयुक्तांनी लगेच परवानगी दिली. झाडाचे मुळ स्थान अर्थात गोरेवाडा तलावाजवळील शासकीय क्वाटर्स परिसरात झाडाचे प्रत्यारोपण करण्याचे आव्हान स्वीकारले गेले.

गेल्यावर्षी प्रत्यारोपणाप्रसंगी उद्यान विभागाच्या कर्मचा-यांनी पडलेल्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्या. मुळापासून वर २० फुटापर्यंत झाडाची उंची ठेवण्यात आली. हे करताना मनपाच्या कारखाना विभागाद्वारे जेसीबीने २५ फुट रुंद आणि १२ फुट खोल मोठा खड्डा खणण्यात आला. झाडाचे यशस्वी प्रत्यारोपण करून ते पुढे जगावे यादृष्टीने पूर्ण काळजी घेण्यात आली. खणलेल्या खड्ड्याचे झाडाच्या वाढीच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण करण्यात आले. माती, खत सर्व टाकण्यात आले. झाडाच्या फांद्या कापताना झाडाचा तोल हळुहळू खड्ड्याकडे झुकला जात असल्याने कुठल्याही क्रेनचा आधार न घेता झाडाचे सहजतेने पुनर्रोपन करण्यात उद्यान विभागाला यश आले. झाडाच्या पुनर्रोपनाची प्रक्रिया सुमारे २० ते २५ दिवस चालली.

झाडाचे पुनर्रोपन झाल्यानंतर झाडाला जगविण्यासाठी आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी उद्यान विभागाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वनशेती विभागप्रमुख व्ही.एम. इल्लोरकर यांच्या सल्ल्यानुसार झाडाची मुळे विकसीत करण्यासाठी औषधोपचार करण्यात आला. त्यांच्या सल्ल्यानुसार झाडाच्या आजुबाजूला चार पाईप टाकण्यात आले. यामध्ये मोठ्या पाईपाद्वारे उन्हाळ्यात झाडाला पाणी तर इतर तीन पाईपांद्वारे झाडाच्या वाढीसाठी आवश्यक ‘ग्रोथ हार्मोन्स’चा पुरवठा करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मनपाच्या उद्यान विभागाचे कर्मचारी प्रेमचंद तिमाने यांनी विशेष लक्ष देउन तज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडाची निगा राखण्याचे काम केले.

या यशस्वी कामगिरीनंतर आज वर्षभराने झाड बहरले असून झाडांवर पक्ष्यांनीही आपला अधिवास निर्माण केला आहे. सोमवारी, ५ जून जागतिक पर्यावरण दिनी या झाडाच्या यशस्वी प्रत्यारोपणाचा आनंद झाडाचा वाढदिवस साजरा करून व्यक्त करण्यात आला.

NewsToday24x7

Next Post

रेल्वे गाडी आणि प्लॅटफार्मच्या मधात फसली वृध्द महिला

Tue Jun 6 , 2023
-धावत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्नात ती रक्तबंबाळ – नागपुरला येणार्‍या दक्षिण एक्सप्रेसमधील थरार – गाडीला तासभर उशिर नागपूर :-धावत्या रेल्वेत बसण्याच्या प्रयत्नात एक वृध्द महिला रेल्वेगाडी आणि प्लॅटफार्मच्या मधातील गॅपमध्ये फसली. कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांनी तिला बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आमला रेल्वे स्थानकावर दक्षिण एक्सप्रेसमध्ये घडली. बुधनी पटेल (70) असे त्या वृध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com