तहसीलदार अक्षय पोयाम यांचा कामठी तालुक्यात ई – पीक पाहणी दौरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरवात झाली आहे. आपल्या शेतातील शेतमालाच्या नोंदी स्वत: शेतक-यांनी घेऊन ई पीक पाहणी ॲपवर अपलोड करावयाच्या आहेत. यासंदर्भात शेतक-यांच्या शंकांचे निराकरण करणे, त्यांना ॲपद्वारे नोंदी घेण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच प्रत्यक्ष शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी पथकासह 10 ऑक्टोबर ला कामठी तालुक्याचा दौरा केला.

नवनियुक्त जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी कामठी तालुक्यातील ई पीक पाहणीच्या कामाला प्रशासनाने गती द्यावी असे आदेशीत केल्याप्रमाणे तहसीलदार अक्षय पोयाम यांनी खुद्द ई पीक पाहणी दौऱ्यात सहभागी होऊन इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना समावेशीत करून अधिकारी निहाय गावे वाटप करून एका दिवसात कामठी तालुका पिंजून काढून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी दौरा केला.

याप्रसंगी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी गुंमथळा,एकर्डी,गादा,आजनी, आवंढी गावांना भेटी देऊन ई – पीक पाहणी बघितले. यावेळी गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका कृषी अधिकारी मंजुषा राऊत,नायब तहसीलदार आर बमनोटे, नायब तहसिलदार अमर हांडा, नायब तहसीलदार गोडबोले, कृषी अधिकारी शुभांगी कांमडी, कृषी विस्तार अधिकारी विकास लाडे, मंडळ अधिकारी एम डी कांबळे, वीराग देशमुख, विकास गावंडे, लोखंडे, जयवर्धन महानामा, मनिष दिघाडे यांचा या पीक पाहणी दौऱ्यात सहभाग होता.

या ई पीक पाहणी दौऱ्यात शेतक-यांशी संवाद साधतांना तहसीलदार अक्षय पोयाम म्हणाले, शासनाने सुरू केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात सर्व शेतकरी बांधवांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा. तसेच युद्धपातळीवर हे काम पूर्ण करण्यास शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे. आपल्या गावाची 100 टक्के पीक पाहणी ही ई – पीक पाहणी ॲपवर नोंदवून घ्यावी. प्रत्येक शेतक-याने आपल्या पिकांची नोंद स्वत: घेऊन ॲपवर अपलोड करणे अपेक्षित आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कचा प्रश्न असल्यामुळे ज्या मोबाईलचे नेटवर्क आहे, त्याचा उपयोग करावा. एका ॲन्ड्राईड मोबाईलवरून 20 शेतक-यांच्या नोंदी घेता येते, असे सांगितले. पुढे ते म्हणाले, तरुण पिढी ॲन्ड्राईड मोबाईलचा वापर करीत असल्यामुळे गावातील तरुणांनी ई-पीक पाहणी करण्यास मदत करावी. विशेष म्हणजे आपल्या आई-वडीलांना या कामात मुलांची मदत मिळेल तसेच त्यांची शेतीशी नाळ जुळविणे शक्य होईल. त्यामुळे गावस्तरीय यंत्रणेने तसेच स्थानिक सरपंच व लोकप्रतिनिधींनी यासाठी आपल्या गावातील तरुणांना प्रोत्साहित करावे. तलाठ्यांनी या कामी गावातील युवक व युवतीचे स्वतंत्र गट बनवून त्यांच्या मदतीने जास्तीतजास्त शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले

इ – पीक पाहणीचे फायदे –

15 ऑगस्ट 2021 पासून राज्यात ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांच्या नोंदी घेण्यास सुरूवात झाली आहे. या ॲपमुळे पिकांचे अचूक क्षेत्र वेळेत समजणार असून आर्थिक पाहणी, भविष्यातील कृषी नियोजन करणे शक्य होईल. नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांना वेळेत अचूकपणे नुकसान भरपाई देण्यास देणे तसेच पीक कर्जाचा लाभ देणे सुलभ होईल. शिवाय स्वत:च्या पिकांची नोंद स्वत: केल्याचे मानसिक समाधान मिळून आपण केलेली नोंद लगेच सातबारावर पाहता येईल. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यास सदर ॲप उपयुक्त आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com