छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट महावितरणकडून चार महिने आधीच पूर्ण

नागपूर :- राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले 100 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिक जोमाने काम करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जानिर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते.

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना चाळीस टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला 19 जानेवारी 2022 रोजी ‘रूफ टॉप सोलार प्रोग्रॅम फेज 2’ अंतर्गत 19 जानेवारी 2024 पर्यंत दोन वर्षात घरगुती ग्राहकांसाठी 100 मेगावॅटचे उद्दीष्ट दिले होते. महावितरणने हे उद्दीष्ट सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी म्हणजे चार महिने आधीच पूर्ण केले.

केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाला महावितरणकडून राज्यातील कामगिरीबाबत दर महिन्याला अहवाल पाठविण्यात येत आहे. कंपनीकडून राज्यात छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी ग्राहकांना मदत करण्यात येते. याविषयीची माहिती https://www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.

महावितरणने छतावरील सौर ऊर्जा निर्मिती संच बसवून देण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा केली व संबंधित यंत्रणांशी चांगला समन्वय साधला. त्यामुळे चार महिने आधी उद्दीष्टपूर्ती करता आली. रूफ टॉप सोलरविषयी उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

राज्यात 25 सप्टेंबर रोजी रूफ टॉप सोलर वापरणाऱ्या ग्राहकांची एकूण संख्या 1.06.090 झाली आहे व एकूण वीजनिर्मिती क्षमता 1.675 मेगावॅट इतकी झाली आहे. राज्यात 2016-17 या आर्थिक वर्षात केवळ 1.074 ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले होते व त्यांची एकूण क्षमता 20 मेगावॅट होती. त्यानंतर महावितरणकडून विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढत गेली.

सर्वसाधारणपणे एखाद्या कुटुंबाला 3 किलोवॅटचा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प पुरेसा ठरतो. त्यासाठी सरकारकडून सुमारे 43 हजार रुपये ते 56 हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना तीन किलोवॅटनंतर प्रत्येक किलोवॅटला सुमारे सात ते नऊ हजार रुपये अनुदान मिळते. वैयक्तिक वीज ग्राहकांसोबतच हाऊसिंग सोसायट्याही रूफ टॉप सोलर योजनेचा लाभ घेतात व त्यांनाही अनुदान मिळते. हाऊसिंग सोसायट्यांना 500 किलोवॅटपर्यंतचा प्रकल्प बसविता येतो व सार्वजनिक सुविधेसाठीच्या या प्रकल्पांना प्रति किलोवॅट 7294 रुपये अनुदान मिळते.

नागपूर परिमंडलातील ग्राहकांचाही प्रतिसाद

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी नागपूर परिमंडलातील ग्राहकांनी देखील विशेष रुची दखवित एप्रिल ते ऑगस्ट 2023 या पाच महिन्यात तब्बल 3,677 ग्राहकांनी 27.77 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स छतावर बसवून वीजनिर्मिती सुरु केली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 3,392 आणि वर्धा जिल्ह्यातील 285 ग्राहकांचा समावेश आहे.

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अब पुलिस स्टेशनके ठानेदार ही होंगे लोक सूचना अधिकारी

Tue Sep 26 , 2023
– पुलिस अधिक्षकका सुधारित आदेश नागपुर :- केंद्रीय सूचना का अधिकार अधिनियम 2005 के नियम 5 (1) में प्रदत्त शक्तियों के अनुसार पहले नागपुर जिला (ग्रामीण) पुलिस के अधिकार क्षेत्र के अंतर्गत पुलिस कार्यालय, शाखा प्रमुख / पी.ओ. प्रभारी अधिकारि, उप-विभागीय पुलिस अधिकारियों तथा पुलिस उपधीक्षक (मुख्यालय) नागपुर इन्हें लोक सूचना अधिकारी के रूप में नामित किया गया था , […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com