स्वत:साठी वेळ काढा, तंत्रज्ञानाने प्रगत व्हा, सकारात्मक रहा! महिला दिनी मान्यवरांचा मनपाच्या महिला कर्मचा-यांना सल्ला

नागपूर : स्त्री सुदृढ असेल तर संपूर्ण घराचे आरोग्य सुदृढ असते. घरातील सर्वांची काळजी घेताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे लक्ष द्या. स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ काढा. आजचे युग डिजिटल तंत्रज्ञानाचे आहे. या युगात आपला ठसा उमटविण्यासाठी तंत्रज्ञानाने प्रगत व्हा. जगाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. पण त्यासाठी तिने स्वत: अनेक तणावांचा सामना करताना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कणखर असणे गरजेचे आहे. यासाठी सकारात्मक रहा, असे अनेक मौलीक सल्ले मनपाच्या महिला कर्मचा-यांना मान्यवरांनी दिले.जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने बुधवारी ८ मार्च रोजी मनपा मुख्यालयामध्ये महिला दिन कार्यक्रम घेण्यात आला. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून स्वाती अजय गुल्हाने, रंजना राम जोशी, फरहात कुरैशी, समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे, महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष डॉ. भावना सोनकुसळे, सदस्या डॉ. स्मिता सिंगलकर आदी उपस्थित होत्या. प्रारंभी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय गुल्हाने यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने मनपाद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांना गौरवान्वित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुरेखा नीलेश म्हैसकर, प्रतिभा नवले, विदर्भाची पहिली महिला ‘विदर्भ केसरी’ आकांक्षा चौधरी, कुस्तीपटू अंशिता मनोहरे, डॉ. भावना सोनकुसळे, मनपा शाळेतील विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट आणि आत्मनिर्भर महिला बचत गट यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी महिलांना नागपूरात जी-20 देशांची होणारी सी-20 बैठकबद्दल माहिती देण्यात आली तसेच स्वच्छतेचा जागर सुध्दा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या फरहात कुरैशी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची यावर्षी थीम ‘डिजिटऑल’च्या अनुषंगाने मत मांडले. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात महिला अजूनही मागे असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांमध्ये जन्मत:च अनेक गुण आत्मसात असतात. नाविन्यपूर्ण संकल्पना हा महिलांचा स्थायीभाव आहे. त्यांची तर्कशक्ती आणि बुद्धिमत्ताही चाणाक्ष आहे. एकदा एक गोष्ट शिकल्यानंतर त्यात अनेक नवनवीन संकल्पना अंतर्भूत करण्याची क्षमता महिलांची आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने महिलांनी प्रगत होउन त्यात नवसंकल्पना राबवून त्याचा फायदा समाजाच्या उन्नतीसाठी करण्याचे आवाहन श्रीमती फरहात कुरैशी यांनी केले. प्रेक्षक बनून बघणारी गर्दी होणे किंवा गर्दीत चालणे सोपं आहे. मात्र गर्दीतून वेगळे निघून आपली ओळख बनवा व जगाला गर्व वाटेल असे कार्य करा, असा मंत्रही त्यांनी उपस्थित महिलांना दिला.

रंजना जोशी यांनी महिलांच्या कार्याचा गौरव केले. महिलांसाठी एकच दिवस महिला दिन नाही. त्यांना रोजच नवीन संघर्ष, नवीन अडचणी, आव्हानांचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणी आणि आव्हानांना तोंड देणा-या प्रत्येक महिलेसाठी प्रत्येकच दिवस महिला दिन आहे असे सांगत त्यांनी घरघराची शान स्त्री असल्याचा गौरवोल्लेख केला.

मनपाच्या तक्रार निवारण समिती अध्यक्ष तथा झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. सकाळी उठल्यापासून घरातील प्रत्येक स्त्री घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी कामे करीत असते. नोकरी करणा-या महिला घरातील सर्व करून कार्यालयात येतात. अशात घर आणि कार्यालय दोन्ही कामांमुळे अनेकांना तणावाचा सामना करावा लागतो. त्याचे परिणाम पुढे गंभीररित्या दिसून येतात. शरीराची जेवढी जास्त काळजी घेतली जाईल तेवढी जास्त शरीर आपली काळजी घेतो. त्यामुळे रोज स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ काढून व्यायाम, योगा, प्राणायाम करण्याचा सल्ला डॉ. भावना सोनकुसळे यांनी दिला.

समाजविकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी याप्रसंगी आपले मत मांडताना सांगितले की, स्त्री आणि शक्ती दोन वेगळ्या बाबी नसून स्त्री हीच एक शक्ती आहे. महिला आज प्रत्येक क्षेत्रात नवीन दृष्टिकोन अंतर्भूत करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. महिलांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेण्याची मनपाद्वारे दरवर्षी महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक महिला दिनाची यावर्षी ‘डिजिटऑल’ ही थीम आहे. महिलांना तंत्रज्ञान सामावून घेते की नाही हे पडताळण्याची ही योग्य वेळ आहे. तंत्रज्ञानाचा अंगीकार करून नव्या युगात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा आणखी गडद करा, आक्रमकतेला नव्हे सहानुभावाला महत्व द्या, असे आवाहन करताना त्यांनी जे काळाच्या कसोटीवर खरे उतरतील ते भविष्यात वेगळे उदाहरण पुढे ठेवतील, असा मंत्र दिला.

तक्रार निवारण समितीच्या सदस्या ॲड. स्मिता सिंगलकर यांनी महिलांना विविध प्रकारे होणा-या अत्याचाराबाबत माहिती देत त्याबद्दलच्या कायद्यांबद्दल सजग केले. कुठल्याही माध्यमातून, घरी, कामाच्या ठिकाणी वा कुठेही आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्यास तो अन्यायच आहे व त्यासाठी दाद मागायला तक्रार निवारण समितीपुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अत्याचार करणा-यापेक्षा अत्याचार सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे सहन न करता त्याविरोधात आवाज उठवा. सातत्याने अत्याचार सहन करीत राहिल्यास त्याचा महिलांच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अत्याचाराविरोधात तक्रार निवारण समितीद्वारे अनेक महिलांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे समितीपुढे येताना मन खंबीर ठेवा, कुठल्याही दबाव, धमक्यांना न घाबरता तक्रार मागे घेउ नका, कुणी तसा दबाव आणत असल्यास त्याचीही माहिती समितीपुढे देण्याचे आवाहन ॲड. स्मिता सिंगलकर यांनी केले.

कार्यक्रमात नृत्य नाटीकेच्या माध्यमातून समाजविकास विभागाच्या नूतन मोरे, शारदा भुसारी, चित्रा लोखंडे, संगीता मोटघरे, सुषमा भोवते, कल्याणी बरगट आणि मयूरी नानवटकर यांनी नारीशक्तीचा गौरव केला.

प्रास्ताविक कविता खोब्रागडे, संचालन ज्योत्सना देशमुख यांनी केले. आभार नूतन मोरे यांनी मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com