दैनंदिन मृत्यूंचे स्वाईन फ्लू समितीद्वारे विश्लेषण, सुरक्षात्मकदृष्ट्या काळजी घेण्याचे आवाहन

नागपूर  :-  स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) शुक्रवारी (ता.30) नागपूर शहरातील स्वाईन फ्लूच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या सभागृहात स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Committee) बैठक पार पडली.

बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, मनपाचे स्वाईन फ्लू कार्यक्रम नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ.प्रवीण शिंगाडे, प्राध्यापक औषध वैद्यक शास्त्र विभाग GMC, नागपूर , सहा.प्रा.डॉ.हरिष सपकाळ औषध वैद्यक शास्त्र विभाग GMC, नागपूर आदी उपस्थित होते.

स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

समितीसमोर 10 स्वाईन फ्लू संशयीत रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता यापैकी ४ रुग्ण नागपूर शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी २ मृत्यू स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे विश्लेषणातून स्पष्ट झाले. नागपूर शहराबाहेबरील 6 रुग्णाचा मृत्यू झालेला असून तो स्वाईन फ्लू मुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये नागपूर ग्रामीण भागातील 2, इतर जिल्हातिल 3 आणि इतर राज्यातील 1 रुग्ण आहे. असे एकूण 8 रुग्णांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले.

526 रुग्ण स्वाईन फ्लू मुक्त

नागपूर शहरात आतापर्यंत 616 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी नागपूर शहरातील 332, नागपूर ग्रामिण मधील 106 आणि जिल्ह्याबाहेरीत 178 अशा एकूण 616 स्वाईन फ्लू बाधित रुग्णांची नोंद आहे. आतापर्यंत मनपा हद्दीतील 19, नागपूर ग्रामीण 8, नागपूर जिल्ह्याबाहेरील 17 आणि इतर राज्यातील 12 असे एकूण 56 रुग्ण स्वाईन फ्लू मुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये 34 पुरुष व 22 महिला आहेत. यामध्ये 40 ते 80 वयोगटातील जवळपास 85 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना मधुमेह, रक्तदाब, प्रतिकार शक्ती कमी असणा-या किंवा इतर आजार असलेल्या नागरिकांनी स्वाईन फ्लू लसीकरण करावे. मात्र 526 रुग्ण स्वाईन फ्लू ला हरवून सुखरूप घरी पोहोचणे ही सुखद बाब असून वेळीच सतर्कता दाखवून वैद्यकीय उपचार घेतल्यास स्वाईन फ्लू वर मात करणे शक्य आहे.

सर्दी-पडसे, घसा दुखणे, अंगदुखी यासारखे फलू सदृष्य लक्षणे दिसून आल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेउन त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावा. वेळीच औषधोपचार आणि योग्य काळजी घेतल्यास स्वाईन फ्लूवर मात करणे सहज शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे टाळावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com