– शहरात ९ हजार किट वाटणार : नुकसानग्रस्तांना आधार देण्यासाठी मनपाचे पाऊल
नागपूर :- नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक घरे पाण्याखाली आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पूरामुळे बाधित व्यक्तींना आधार देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे पूरग्रस्त भागात अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याची किट वाटपाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी (ता.२५) आशीनगर झोनमधील नोगा फॅक्टरी जवळील मैत्रिका बौद्ध विहार, भीमरत्न नगर, बसोड मोहल्ला या भागांमध्ये अतिरिक्त आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या हस्ते किट वाटप करण्यात आले. यावेळी झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, झोनल अधिकारी जांभुळकर आदी उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील पूरग्रस्त भागामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये ९ हजार किट वाटप करण्यात येणार आहे. या कार्याला आशीनगर झोन येथून सुरूवात झाली. आशीनगर झोनमधील नोगा फॅक्टरी जवळील मैत्रिका बौद्ध विहार, भीमरत्न नगर, बसोड मोहल्ला हे सर्व पूर्णपणे पाण्यात असल्याने या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वस्तीतील पाणी ओसल्यानंतरही येथील जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना मनपाच्या किटद्वारे मोठा आधार मिळाला आहे. आशीनगर झोनमधील विविध पूरग्रस्त भागांमध्ये एकूण ३ हजार किटचे वितरण करण्यात येणार आहे.
पूरामुळे अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या. अनेक घरांचा तळमजला, पहिला मजला देखील पाण्याखाली गेल्याने घरातील वस्तू देखील पाण्यात खराब झाल्या. कपडे, घरातील वस्तू, जीवनावश्यक साहित्य सर्वच पाण्याने हिरावून घेतल्याने नागरिकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर शहरातील स्वयंसेवी संस्था, सेवाभावी नागरिक आणि हॉटेल्सनी पुढाकार घेत नागरिकांना दोन दिवस भोजनाची व्यवस्था करून दिली होती. मात्र यानंतरही अनेक घरांपुढे दोन वेळच्या जेवणाचा भेडसावणारा प्रश्न लक्षात घेत नागपूर महानगरपालिेकेद्वारे अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याची किट अशा परिवारांना उपलब्ध करून देण्याचा पुढाकार घेण्यात आला. गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, तेल, तूर डाळ, बेसन, मिरची पावडर, मिठ या जीवनावश्यक साहित्यांचा समावेश असलेली किट नागरिकांना देण्यात येत आहे. यामुळे पुढील काही दिवस जनजीवन पूर्वपदावर येईपर्यंत या पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळणार आहे.