नागपूर :- जिल्हयामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणुक सहभाग अर्थात स्वीप प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष अभियान सुरू असून त्याव्दारे मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मतदारांसाठी ८ मार्च ते १५ मार्च पर्यंत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, महानगरपालिकेचे सर्व सहाय्यक आयुक्त, पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका, गट शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक संपन्न झाली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी सौम्या शर्मा यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. जिल्हयामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये ७५ टक्यांपेक्षा जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने आठवडाभर विविध उपक्रम राबविण्याचे ठरले असून १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, युवती, शहरी भागातील बचत गट व माविमचे बचत गट हे मतदानासाठी प्रतिज्ञा घेतील. प्रतिज्ञा घेतलेल्या महिलांचा छायाचित्रांसह संकलित करण्यात आलेला अहवाल निवडणूक विभागास सादर करण्यात येणार आहे.