लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरूय – अजित पवार

केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय?मुहुर्त बघताय का?…

मुंबई  :- अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत… लोकांसमोर कसे जायचे… जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे – सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशापध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे असा थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी समर्पक उत्तरे दिली.

सरकारने जर वेगवेगळ्या योजना आणि त्या योजनेबद्दल जाहिरात करून लोकांना जागृत केले असते तर समजू शकतो. आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळी अशी जाहिरातबाजी केली नाही. आम्ही निवडून आलो त्यावेळीही जाहिराती केल्या नाहीत असेही अजित पवार म्हणाले.

आज केंद्र व राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. त्या अनिल बोंडेना सांगा तपास करा.. ‘दूध का दूध पानी का पानी’ येऊ द्या लोकांसमोर… वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे… यामागे कोण सूत्रधार आहे ते समोर येऊ दे आणि जो कुणी दोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे. अजिबात कुणाचा मुलाहिजा बाळगू नका पण त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झाले ती मदत मिळाली नाही. पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि नियमित परतफेड करणार्‍या तमाम शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळायला हवे होते ते काही प्रमाणात काहींना मिळाले आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये आणि बजेटमध्ये ही रक्कम घेतली आहे. त्यातून मंजूर करून देतील. त्यामुळे अंमलबजावणीसाठी थोडा वेळ सरकारला द्यावा लागेल. थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग आम्ही आमची भूमिका मांडू असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आता सध्या जे सुरू त्याचे एकमेव कारण म्हणजे महागाई आटोक्यात आणता येत नाही, बेरोजगारी कमी करता येत नाही. उद्योगधंदे आणण्यासाठी जे पोषक वातावरण तयार व्हायला हवे ते होत नाही. कायदा व सुव्यवस्था आटोक्यात आणली जात नाही महिलांवर, मुलींवर भगिनींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. अरे हे काय चाललंय… ही मोगलाई आहे का? असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी रिक्षावाला हा माझाच शब्द आहे  शरद पवार यांचा नाही. मी शरद पवार यांचे नाव घेतले पण शब्द माझा… उध्दव ठाकरे एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होते असे म्हटले होते त्यामुळे हा वाद अरविंद सावंत यांनी क्लीअर केला आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग कुठल्या वेळेची वाट बघताय?मुहुर्त बघताय का? सावरकरांना भारतरत्न देण्याचा असा थेट सवाल अजित पवार यांनी उपस्थित करुन वेळ कशाची असते. अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत त्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात सावरकर आहेत. गौरवयात्रा काढता मग कोश्यारी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महापुरुषांबद्दल भाजपचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली. त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे अशा शब्दात अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नरेंद्र मोदी यांची २०१४ ला डिग्री बघून लोकांनी निवडून दिले का? त्यांनी देशात स्वतः चा करिष्मा निर्माण केला. जो भाजपचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता असा टोला लगावतानाच याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

डिग्रीवर काय आहे आतापर्यंत सुरुवातीपासून देशाचे पंतप्रधान झाले, अनेक मुख्यमंत्री झाले. आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करून निवडून येणाऱ्याला महत्त्व आहे. बहुमत असेल तो प्रमुख होतो. त्यामुळे शिक्षणाच्याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रात पदवी झाल्याशिवाय काम करु शकत नाही. असे राजकारणात नाही त्यामुळे ते आज ९ वर्ष देशाचे पंतप्रधान आहेत आणि आता डिग्रीचे काढले जाते हा महत्त्वाचा प्रश्न नाही. सध्या महत्त्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली आहे त्याबद्दल बोलायचं नाही चर्चा करायची नाही. नोकरी कधी मिळणार या आशेवर तरुण आहेत. ७५ हजाराची वेगवेगळ्या खात्यात भरती होणार होती. त्याचे काय झाले . शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार, सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते आपण सोडून देतो त्यामुळे डिग्री या विषयाला फार महत्व द्यावे असे मला वाटत नाही असेही अजित पवार म्हणाले.

आपण देशाला का मागे मागे नेतोय हेच कळेना… अभ्यासक्रमातून देशाचा इतिहास काढला तरी त्या इतिहासाची इतिहासात कायमची नोंद राहणार आहे ना. जो इतिहास आहे त्याला घाबरायचं काय… आहे तो आहे. कुठल्या विचारसरणीत आपण जगतो, राहतो आणि काय करतो मला कळायला मार्ग नाही. या विषयातून महागाई, बेरोजगारी कमी होणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी केला.

पोपट घेऊन भविष्य बघणारा असतो ना… त्याचा तो पोपट बाहेर येतो आणि एक – एक पत्ता काढून हातात देतो तसे दिसलं की काय त्यांना… असा टोला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अजित पवार यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आगामी सण, उत्सव सौहाद्रपूर्ण वातावरणात साजरे करावे-एसीपी बी. एन. नलवाडे

Mon Apr 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आगामी हनुमान जयंती ,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या सनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे नागरिकांनी वागू नये,शिवाय सोशल मिडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच हे सण उत्सव कायदा व सण उत्सव चे पालन करून सौहाद्रपूर्ण वातावरणात साजरे करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त बी एन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!