… तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी – महेश तपासे

उद्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे जेल भरो आंदोलन;निलेश राणेला २४ तासाचा अल्टीमेटम…

मुंबई  :- निलेश राणेने केलेल्या ट्वीटला नारायण राणे तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे ट्वीट मान्य आहे का? या ट्वीटशी भाजप सहमत आहे का? राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ट्वीटबाबत काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे. जर हे ट्वीट मान्य नसेल तर निलेश राणेसह भाजपने महाराष्ट्राची व राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान निलेश राणे याला ट्वीट डिलीट करायला २४ तासाचा अवधी देण्यात आला असून उद्या सकाळी अकरा वाजता माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

निलेश राणे याने जे ट्वीट केले ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वेदना देणारे आहे. त्याने सकाळी की रात्री ट्वीट केले याची माहिती घेण्याची आवश्यकता आहे असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला आहे.

तुमच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला शरद पवार यांना बोलावले. याचा अर्थ नारायण राणे पवार यांना मानतात. देशाचे पंतप्रधान हे पवार यांना गुरूस्थानी मानतात अशावेळी शरद पवार यांना औरंगजेबाची उपमा देणे किती योग्य आहे असा सवाल करतानाच निलेश राणे याला २४ तासाची मुदत देत त्याने ते ट्वीट डिलीट करावे, आक्षेपार्ह वक्तव्य मागे घ्यावे व जाहीर माफी मागावी आणि संबंधित यंत्रणेने सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

आमच्या वडीलांना, आमच्या पितृतुल्य नेत्याला औरंगजेब म्हणत असतील तर महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्र गप्प बसणार नाही असा इशाराही महेश तपासे यांनी दिला.

निलेश राणेसारखा व्यक्ती ज्याचे काहीच कर्तृत्व नाही तो ५६ वर्षाची राजकीय कारकीर्द असलेल्या शरद पवार यांना औरंगजेबाची उपमा देतो. त्यावर त्याला भाजपचे कुणीच बोलायला तयार नाही. दुसरीकडे तो पडळकर त्याची तरी काय लायकी आहे. काय समजतो निलेश राणे स्वतः ला असा संतापही महेश तपासे यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांना जाणुनबुजुन उपमा देऊन धार्मिक ध्रुवीकरण, राजकीय ध्रुवीकरण करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा भाजपकडून कार्यक्रम केला जात आहे. भाजपने, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नोंद घ्यावी व निलेश राणे याला ते ट्वीट डिलीट करायला भाग पाडावे आणि निलेश राणे याच्याबाबत भाजप काय भूमिका घेणार हे स्पष्ट करावे अशीही मागणी महेश तपासे यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

ज्येष्ठ पत्रकार अरुण बाळकृष्ण फणशीकर यांचे निधन

Fri Jun 9 , 2023
नागपूर :- ज्येष्ठ पत्रकार, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अरुण बाळकृष्ण फणशीकर यांचे आज दु:खद निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. ते अविवाहित होते. काल रात्रीपासून ते बेपत्ता होते. आज दुपारी गिरिपेठेतील घरच्या विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. गेली काही वर्षे ते असाध्य रोगाने आजारी होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज आहे. अत्यंत मितभाषी, हुकमी बातमीदार म्हणून […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com