कौशल्य निर्माण करणारा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण – अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांचे प्रतिपादन

– गणित दिवसानिमित्त विद्यापीठात विविध कार्यक्रम

नागपूर :-विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करणारा अभ्यासक्रम महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी यांनी केले. राष्ट्रीय गणित दिवस व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी पर्व निमित्त शनिवार, १८ मार्च ते सोमवार २० मार्च २०२३ दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन (डीएसटी) भारत सरकार आणि राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन महाराष्ट्र सरकार यांच्या सहयोगाने रामानुजन सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अधिष्ठाता डॉ. माहेश्वरी हे शनिवार, १८ मार्च रोजी बोलत होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून मध्य‌ प्रदेशातील बुंदेलखंड विद्यापीठातील मॅथेमॅटिकल सायन्स आणि कॉम्प्युटर अप्लिकेशन विभागाचे डॉ. धर्मेंद्र बादल, विद्यापीठाचे गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. माहेश्वरी यांनी विज्ञानातील गणिताचे महत्त्व अधोरेखित केले. गणिताशिवाय विज्ञान पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळेच गणिताला विज्ञानाचे पितामह म्हटले जाते असे माहेश्वरी म्हणाले. विद्यापीठातील गणित विभागाने अभ्यासक्रमात बदल करून विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध करून दिली. कौशल्यपूरक गणित विषयाचा अभ्यासक्रम तयार केल्याने या विभागातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे. विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण सेल मार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये एकूण २४ पैकी तब्बल गणित विभागातील एका विद्यार्थ्यांची टीसीएस मध्ये निवड झाली तर २१ विद्यार्थ्यांनी अजिज प्रेमजी फाउंडेशनची पूर्व परीक्षा उत्तीर्ण केल्याचे डॉ. माहेश्वरी यांनी सांगितले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच कौशल्य वाढीबाबत असलेले ऑनलाइन कोर्सेस विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. आयआयटी मधील शिक्षक ऑनलाईन कोर्सेसला शिकवितात. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून आयआयटीत शिक्षण घेण्याचे माध्यम उपलब्ध झाले, असे माहेश्वरी म्हणाले. शिवाय गणित विभागाच्या अभ्यासक्रमात बदल करीत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याने विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार यांचे डॉ. माहेश्वरी यांनी अभिनंदन केले.

उद्घाटनानंतर लगेच मध्य‌ प्रदेशातील बुंदेलखंड विद्यापीठातील मॅथेमॅटिकल सायन्स आणि कॉम्प्युटर अप्लिकेशन विभागाचे डॉ. धर्मेंद्र बादल यांचे डाटा मायनिंग या विषयावर व्याख्यान झाले. दुपारच्या सत्रात डॉ. विशाल लिचडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रविवार, १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रश्नमंजुषा इलिमिनेशन फेरी, दुपारी १२.३० वाजता प्रश्नमंजुषा अंतिम फेरी, दुपारी २ वाजता परिसंवाद स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी सोमवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता व्हीएनआयटी नागपूर येथील डॉ. जी. नागा राजू यांचे ‘संख्यात्मक पद्धतींचा वापर’ या विषयावर तर दुपारी १ वाजता माथूरदास मोहता विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील माजी प्रोफेसर डॉ. अरुण मुक्तीबोध यांचे ‘आधुनिक जगात गणिताची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी नुपूर मिश्रा हिने केले तर आभार कपिल सरदार यांनी मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com