नामांतर, मंडलबाबत शरद पवारांचा युवा पिढीची दिशाभूल करण्याचा डाव – भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा घणाघात

मुंबई :- पुण्यातील एका संघटनेच्या अधिवेशनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आणि मंडल आयोग बाबत केलेली वक्तव्ये युवा पिढीची दिशाभूल करणारी आहेत. या वक्तव्याबाबत शरद पवार यांनी खुलासा करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, चैनसुख संचेती, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

बागडे म्हणाले की, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या अधिवेशनात बोलताना पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर आणि मंडल आयोग अहवालाची अंमलबजावणी याला विशिष्ट वर्गाने नेहमीच विरोध केल्याचे वक्तव्य केले.त्यांचे हे वक्तव्य युवा पिढीची दिशाभूल करण्यासाठीच होते.विद्यापीठ नामांतराला संघ, जनसंघ व संघ परिवारातील संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यासाठीच्या आंदोलनातही संघ परिवारातील नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मविआ मधील घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेसनेच मंडल आयोगाचा अहवाल तब्बल १० वर्षे दाबून ठेवला होता. तसेच मराठवाडा विद्यापीठ नामांतराला त्यावेळच्या शिवसेनेने विरोध केला होता. आता या दोन पक्षांसोबत शरद पवार यांनी महाविकास आघाडी स्थापन केल्यामुळे या मुद्द्यांचा पवार यांना सोईस्कर विसर पडल्याचा टोला बागडे यांनी लगावला. मंडल आयोगाची स्थापना मोरारजी देसाई पंतप्रधान असताना करण्यात आली होती. १९७९ मध्ये मंडल आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला होता त्यानंतर सत्तेत आलेल्या कॉंग्रेसने त्याची अंमलबजावणी केली नाही. १९८९ साली तब्बल १० वर्षांनी व्ही. पी.सिंग यांचे सरकार आल्यानंतर मंडल आयोग अहवालाची अंमलबजावणी झाली, असे बागडे यांनी नमूद केले.

बागडे म्हणाले की, १९७८ साली शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या घोषणेनंतर मोठा हिंसाचार झाला. त्यावेळी संघ परिवाराने शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न केले होते याचा पवारांना आता विसर पडल्याचा आरोप बागडे यांनी केला.

केवळ नव्या पिढीची दिशाभूल करण्यासाठी  पवारांनी बिनबुडाचे वक्तव्य केले असून या वक्तव्याचा त्यांनी खुलासा करावा असे आव्हान बागडे यांनी दिले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com