मुंबई :- विज्ञानकथा व विज्ञान कादंबरी वर्तमानातील चिंता – व्यथा विसरायला लावून त्या वाचकाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान कथा व विज्ञान कादंबरी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. स्तंभलेखिका, ब्लॉगर व आयकर विभागाच्या महासंचालक डॉ. साधना शंकर यांनी लिहिलेल्या ‘असेन्डन्स’ या विज्ञान कादंबरीच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
अन्न सुरक्षा, आरोग्य, लोकसंख्या नियंत्रण, पाण्याचे दुर्भिक्ष यांसारख्या मूलभूत समस्यांवर केवळ विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करता येते. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात बुद्धिमान व मेधावी विद्यार्थी आले पाहिजे, असे सांगताना विज्ञान शिकविण्यासाठी व त्यात मुलांना गोडी लागण्यासाठी ध्येयवादी व बांधिलकी असणाऱ्या शिक्षकांची गरज आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
विज्ञान कथा – कादंबरी लेखक हे काल्पनिक सृष्टी निर्माण करणारे ‘विश्वकर्मा’च असतात, असे नमूद करून राज्यपालांनी लेखिका डॉ साधना शंकर यांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले. ‘असेन्डन्स’ ही कादंबरी हिंदी भाषेत अनुवादित झाली असून तिची मराठी व तेलगू आवृत्ती लवकरच प्रकाशित होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. पुरुष व स्त्री यांना अनेक शतके प्रजा निर्मितीसाठी परस्परांची गरज नसल्यास त्यांच्यातील नातेसंबंध कसे असतील या मुख्य संकल्पनेवर ही वैज्ञानिक कादंबरी आधारलेली असल्याचे लेखिका डॉ साधना शंकर यांनी सांगितले. आगामी काळात या कादंबरीवर आधारित टीव्ही मालिका काढण्याबद्दल विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला परराष्ट्र सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी व मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. शेषाद्री चारी, गोवानी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवानी, ज्येष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.