डेंग्यु जनजागृती करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा होणार सत्कार  

मनपातर्फे देण्यात आले होते स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड

विविध बक्षिसांद्वारे दिले जाणार प्रोत्साहन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यु प्रतिबंध मोहीमेत जनजागृती करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. लकी ड्रॉ द्वारे सदर विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्याचा कार्यक्रम लवकरच मनपा सभागृहात घेतला जाणार आहे. 

आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात डेंग्यु व इतर कीटकजन्य आजाराचा प्रसार होऊ नये या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेअंतर्गत शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले गेले होते. ॲक्टिव्हिटी कार्डद्वारे विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने घरी उत्पत्ती होऊ शकणाऱ्या डासांना आळा घालण्यास उपाययोजना केल्या. 

आठवड्यातुन एक दिवस पालकांच्या मदतीने पाणी साठवलेली भांडी तपासणे, कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी तपासणे, डासअळी आढळल्यास पालकांच्या मदतीने भांडे कोरडे करणे व कापडाने पुसुन घेणे इत्यादी कार्यांद्वारे डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे ही सर्व कार्ये ही पालकांच्या उपस्थितीतच करण्यात आली.

शहरातील १४५ शाळांनी यात भाग घेतला होता, ३० सप्टेंबर रोजी मोहीम संपल्यावर शालेय विद्यार्थी आपले स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड वर्गशिक्षक यांच्याकडे जमा केले जात असुन शाळास्तरावर लकी ड्रॉ शिक्षकांच्या माध्यमातुन घेण्यात येत आहे. तसेच सदर माहीती आरोग्य विभागाकडे जमा करण्यात येत आहे. यानंतर लकी ड्रॉ द्वारे मनपातर्फे महानगरपालिकास्तरावर बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी सर्व शाळांनी आपल्या स्तरावर लकी ड्रॉची प्रक्रिया लवकरात लवकर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com