–विविध घटकांसाठी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य
यवतमाळ :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसदच्या वतीने केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी 85 टक्के अनुदानावर विविध आर्थिक सहाय्याच्या योजना राबविण्यात येत आहे. विविध घटकांसाठी पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य दिले जाते.
केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजनेमध्ये आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर शेतीला काटेरीतार, सोलर फेन्सिंग करीता अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर ताडपत्री खरेदीकरीता अर्थसहाय्याची योजना आहे.
वैयक्तीक वन हक्क लाभधारक, स्वाभिमान सबळीकरण योजनेच्या लाभधारक शेतकऱ्यांना काटेरी तार खरेदीकरता 85 टक्के अनुदानावर अर्थसहाय्य, आदिवासी महिला बचत गटास मोठ्या साधारण व्यवसायाकरीता अर्थसहाय्य करणे व आदिवासी शेतकऱ्यांना कुंपनाकरीता सोलर पॅनल्स व बॅटरी झटका मशीन खरेदी करीता अर्थसहाय्य करणे या योजनांचा समावेश आहे.
लाभार्थ्यांनी या योजनांसाठी आवेदन सादर करतांना सोबत जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, रंगीत पासपोर्ट फोटो, सातबारा उतारा, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी आपले अर्ज दि.२८ फेब्रुवारी पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद जि. यवतमाळ येथे प्रत्यक्ष सादर करावे, असे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.