सत्ता हातून गेली की भल्याभल्यांचा तोल सुटतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरे आणि त्यांचे उजवा हात असलेले कथित विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची देखील सध्या हीच अवस्था आहे असे दिसते आहे. उद्धव ठाकरे कधीतरी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात किंवा पत्र परिषदेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करीत आपल्या वल्गना करीत असतात. तर संजय राऊत रोज सकाळी ९ वाजता पत्रकार आणि चॅनलवाले गोळा करून हव्या तेवढ्या आणि हव्या तशा थापा मारत असतात. त्याचबरोबर ते ज्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत त्या दैनिक सामनामधूनही मनाला येईल ते खरडत असतात.
दोन-तीन दिवसांपूर्वी दैनिक सामन्याच्या रोखठोक या सदरातून त्यांनी अशाच काही वल्गना केल्या होत्या. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागल्यामुळे अतिशय निराश असल्याचा दावा केला होता. शिंदे आणि फडणवीसांमध्ये सध्या संबंध अतिशय ताणलेले आहेत असेही ते सांगत होते. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होऊन जवळजवळ दोन महिने लोटले तरी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी निवासाला का जात नाहीत याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी बोलतानाही वर्षा बंगल्याचाच प्रश्न उपस्थित केला. फडणवीसांचा परिवार वर्षा बंगल्यात काहीतरी जादूटोणा केला गेला आहे. त्यामुळे आपल्याला काही धोका होईल या भीतीनेच तिथे जाण्याचे टाळतो आहे असा दावा त्यांनी केला होता. पुढे जाऊन आज हा लेख लिहीत असतानाच संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याच्या लॉनवर गोहत्तीहून कामाख्या देवीच्या मंदिरातून आणलेले रेड्याचे शिंग पुरले असून ते अशुभ असल्याची शंका व्यक्त केली होती. सद्यस्थितीत वर्षा बंगला पूर्णतः पाडून तिथे नवीन बंगला बांधण्याचा फडणवीस यांचा मानस असल्याचाही जावईशोध राउतांनी लावला होता.
शिवसेनेतून बंड करून बाहेर पडताना अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना २०२४ नंतरही मुख्यमंत्री तुम्हीच राहाल असा शब्द दिला होता, आणि तो शब्द न पाळल्याने शिंदे निराशही आहेत असे तर्ककुतर्क संजय राऊत यांनी काढले होते. इथे मुळात प्रश्न असा येतो की अमित शहा असे काही बोलले होते किंवा त्यांनी असा काही शब्द दिला होता हे अमित शहा किंवा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या कानात येऊन सांगितले का? किंवा मग शिंदे आणि शहा बोलत असताना संजय राऊत यांनी चोरून ऐकत होते का ?असाच जावई शोध २०१९ मध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून लावला होता. अमित शहा मुंबईत मातोश्रीवर आले असताना बाळासाहेबांच्या खोलीत त्यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद तुम्हाला देऊ असे वचन दिल्याचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दावा होता. त्यावेळी त्या खोलीत म्हणे उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे दोघेच होते. अमित शहा यांनी आपण असे कोणतेही वचन दिले नसल्याचा खुलासा केला होता. आता इथे खरे कोण बोलते याचा शोध घेणे शक्य नव्हते. मात्र उद्धव ठाकरेंनी मतदारांशी त्यापूर्वीही अनेकदा खोटेपणा केला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दावर कोणीच विश्वास ठेवला नाही. त्यांनी २०१९ मध्ये जनमताचा अनादर करून काँग्रेससोबत जात सत्ता बळकवली असा जनसामान्यांचा समज झाला, आणि त्याची शिक्षा त्यांना मतदारांनी २०२४ मध्ये दिलीच आहे. त्यामुळे संजय राऊत यांची ही लोणकढी थाप आहे की त्यात काही तथ्य आहे हे अमित शहा आणि एकनाथ शिंदेच सांगू शकतात. सध्या ते काहीही बोलत नाहीत. त्यामुळे संजय राऊत किती खरे बोलतात हे परमेश्वरच जाणे. तसाच प्रकार वर्षा बंगल्याचाही आहे. फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का गेले नाही याला त्यांची कारणे असतीलही. मात्र तिथल्या जमिनीत रेड्याची शिंगे पुरली आहेत असे वर्षा बंगल्याचा स्टाफ सांगतो असे राउत म्हणतात. ही मात्र राऊत यांची लोणकढी थापच आहे हे उभा महाराष्ट्र जाणतो. मात्र कुठे यांच्या तोंडाला लागता म्हणून राजकारणी आणि सामान्य माणूसही दुर्लक्ष करतो. ते राउतांना फावते आहे.
राज ठाकरेंचे बिनबुडाचे दावे…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच पक्ष कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यात त्यांनीही विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात घोटाळा झाल्याचा आरोप करीत हा ईव्हीएम मशीनचा घोटाळा असल्याचा दावा केला. लोकांनी आम्हाला मते दिली, पण ती आमच्यापर्यंत पोहोचलीच नाहीत असेही त्यांनी ठासून सांगितले. मात्र त्यांच्या या दाव्यावर आता कोणीही विश्वास ठेवणार नाही. कारण ईव्हीएम घोटाळ्याबद्दल सर्वच विरोधी पक्षांनी गळे काढून झालेले आहेत. फक्त राज ठाकरेच तेवढे बाकी राहिले होते. त्यांनी देखील आपले कर्तव्य पूर्ण केले आहे इतकेच.
माझ्यावर सातत्याने भूमिका बदलत असल्याचा आरोप केला जातो, असे सांगून राज ठाकरेंनी त्याचाही समाचार घेतला. त्यांनी अगदी १९७० पासून सध्या त्यांचे विरोधक असलेले शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांनी वेळोवेळी कशा भूमिका बदलल्या आणि कशी भिन्न विचारधारांशी युती केली याचे दाखले दिले. मग मी प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेतली तर काय हरकत असा सवालही त्यांनी केला. मात्र राज ठाकरे एक बाब विसरले की या पक्षाच्या नेत्यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या असतीलही. मात्र त्याची मतदारांना पटेल अशी कारणमीमांसा घेऊन ते जनतेसमोर गेले. तुम्ही मात्र २००६ मध्ये पक्षस्थापना झाल्यावर २००९ साली जी एक भूमिका घेऊन मतदारांसमोर गेले होते, ती भूमिका दर निवडणुकीत बदलत गेले, आणि दरवेळी मतदारांना तुमची भूमिका का बदलली हे कधीच पटवून देण्याचा प्रयत्नही केला नाही. मग मतदारांनी तुमच्यावर विश्वास का ठेवायचा? तुम्ही भूमिका बदलताना ती जनहिताची कशी आहे हे जनसामान्यांना पटवून दिले असते तर महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी उभी राहिली असती.२००९ मध्ये तुमचे १२ आमदार निवडून आले होते. त्यावेळी तुम्ही काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतली होती.
मात्र आपल्या ४ आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊन मोकळे झाला होतात. त्याचीच शिक्षा मतदारांनी तुम्हाला २०१४ मध्ये फक्त २ आमदार निवडून आणून दिली होती, हे तुम्ही विसरू शकत नाही. त्यामुळे उगाच मतदार आणि विरोधकांवर बिनबुडाचे आरोप करुन आगपाखड करण्यापेक्षा आपण कुठे चुकतो ते बघून आपण निर्णय घ्यायला हवा, हे जनसामान्यांचे आपल्या बाबत मत आहे हे लक्षात घ्यायला हवे.
दबाव मुंडेंच्या राजीनाम्यासाठी…
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर धनंजय मुंडे यांचा मुद्दा खूपच गाजतो आहे. इथे ९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाली. या हत्येचा सूत्रधार वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंओ धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता होता असा स्थानिकांचा आरोप आहे. हे सूत्र धरून सर्व मुंडे विरोधक मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी गेले दोन महिने सातत्याने लावून धरत आहेत. परिणामी आता संतोष देशमुख च्या परिवाराला न्याय द्यायला हवा हा मुद्दा बाजूला पडला आहे, आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय विरोधक फक्त मुंडेंचा राजीनामा या एकाच मुद्द्यावर एकत्र झाले आहेत. त्यात सुरेश धस, संदीप क्षीरसागर, सुरेश सोळंके, नमिता मुंदडा हे जिल्ह्यातले आमदार तर आहेतच . त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे देखील सक्रिय झाले आहेत. भरीस भर आता अंजली दमानिया यादेखील दंड थोपटून मैदानात उतरल्या आहेत . सुरेश धस जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया आता धनंजय मुंडेंच्या वेगवेगळ्या कथीत भानगडी बाहेर काढून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा सातत्याने मागणी करत आहेत. या दबावतंत्राच्या प्रकाराने त्रासून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या वंजारा समाजाचे धर्मगुरू भगवान गडावरील नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळवला. लगेचच सर्व माध्यमांसह मुंडेविरोधक राजकीय नेत्यांनी धनंजय मुंडे हे दबाव वाढण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी ओरड सुरू केली. मुंडे हे राजकारणी आहेत. त्यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर विरोधक दबाव आणणार असतील तर उत्तरात तेही दबावतंत्र वापरणारच.नामदेव शास्त्री हे वंजारा समाजाचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा शब्द समाज मानतो. ही बाब लक्षात घेऊनच मुंडेंनी हे दबावतंत्र वापरले हे उघड आहे.नामदेव शास्त्रींनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंत्र्याला पाठिंबा द्यायला नको होता असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केल्याचे वाचण्यात आले. मात्र याच जितेंद्र आव्हाडांनी अनंत करमुसे नामक एका अभियंत्याला पोलिसांमार्फत आपल्या बंगल्यावर बोलावून मारहाण केली होती. त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे या सर्वांचा त्यांनी पाठिंबा मिळवला होता. हे ते सोयीस्कररित्या विसरले.
भाजपच्या मित्रपक्षांनी यांचे भान ठेवावे…
महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर २०२४ रोजी झाला.त्यानंतर जवळजवळ १० दिवसांनी खातेवाटप झाले. नंतर तब्बल महिन्याभराने पालकमंत्रीही ठरले. आता काही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून तीनही पक्षांमध्ये वाद सुरू आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट हे जास्त आक्रमक झाले आहेत. मात्र हे दोन्ही पक्ष एक बाब विसरतात की आज जरी त्यांच्या पाठिंबावर भाजपाचे सरकार सत्तारूढ असले तरी आज भाजपचीच सदस्य संख्या १३२ इतकी आहे. सहयोगी सदस्य मिळून ती १३७ होते. सत्तेत असताना अजून आठ-दहा सदस्य मॅनेज करून त्यांना सरकार तगवणे फारसे कठीण नाही.२०१४ साली फक्त १२२ सदस्य असतानाही आणि शिवसेना सतत धमक्या देत असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी याच शिवसेनेच्या पाठिंब्यावर पाच वर्षे सरकार टिकवले होते हे मित्रपक्ष विसरतात. मात्र या सर्व तणातणीत सत्ताधारी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यातील सदस्यांनी एक बाब लक्षात ठेवायला हवी की तुमची आपापसातली भांडणे अशी चव्हाट्यावर आणून तुम्ही ज्या मतदारांनी तुम्हाला भरभरून मते दिले त्या मतदारांचाच तुम्ही विश्वास गमावता आहात. जर असेच चालू राहिले तर ते मतदार तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. इथे मला या राजकीय पक्षांना १९७७ ते १९७९ या काळात जनता पक्षाच्या राजवटीत जे काही घडले, त्याची आठवण द्यावीशी वाटते १९७७ साली काँग्रेसला नाकारून नव्याने तयार झालेल्या जनता पक्षाला जनतेने भरभरून मते दिली. मात्र या जनता पक्षातील विभिन्न विचारधारेचे लोक नंतर सत्तेसाठी परस्परांशी भांडू लागले. परिणामी त्यांचे सरकार अडीच वर्षातच कोसळले आणि देशात फेरनिवडणुका झाल्या. यावेळी १९८० च्या जानेवारी महिन्यात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत मतदारांनी जनता पक्षाला पार नाकारले आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसला स्पष्ट बहुमतासह सत्तेतय आणले होते. जनतेला तुमची भांडणे नको असतात. त्यामुळे तुम्ही जर असे भांडत राहिलात तर जनता पुढल्या वेळी तुम्हाला तुमची जागा दाखवेल याचे भान भाजपच्या मित्रपक्षांनी ठेवायला हवे.
– अविनाश पाठक