विक्रीकराची अभययोजना अंतिम टप्यातः राज्यभरातून लाभला अभूतपूर्व प्रतिसाद

मुंबई :-  शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या विक्रीकराची अभय योजना 2022 ला संपूर्ण राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत आहे. 22 सप्टेंबर 2022 ला विभागाकडे थकबाकी प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांपैकी जवळपास 50%, म्हणजे 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांना या अभय योजनेचा लाभ झाला आहे.

1 एप्रिल 2022 पासून ही योजना सुरु झाली असून जीएसटी पूर्व कायद्यांच्या थकबाकीतून कायमचे बाहेर पडण्याची शेवटची नामी संधी, असे या योजनेचे वर्णन केले जात आहे. आतापर्यंतच्या प्रतिसादावरून ही योजना सर्वात आकर्षक आणि व्यापारी वर्गासाठी सर्वात जास्त फायदेशीर अभय योजना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छोट्या व्यापाऱ्यांकरिता आकर्षक सवलती

या योजनेत छोटे व्यापारी विशेषतः ज्यांची थकबाकी दहा हजारापर्यंत आहे, त्यांना अर्ज देखील दाखल न करता पूर्ण थकबाकी माफ करण्यात आलेली आहे. मात्र या योजनेची वैशिष्ठ्य ठरलेली व कमालीची लाभलेली वर्गवारी म्हणजे दहा हजार ते दहा लाखापर्यंतची प्रलंबित थकबाकी. या वर्गवारीतच विभागाकडे सर्वाधिक प्रलंबित प्रकरणेदेखील आहेत. या वर्गवारीत एकरकमी फक्त वीस टक्के थकबाकी भरून ऐंशी टक्के थकबाकी सरसकट माफ केली जात असल्याने, अधिकाधिक व्यापाऱ्यांनी या सवलतीचा लाभ घेऊन प्रलंबित थकबाकीतून कायमची मुक्तता मिळवलेली आहे.

मोठ्या म्हणजेच 50 लाखांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी हप्तेसवलती सारखा सोयीचा पर्याय उपलब्ध असल्याने, अशा मोठ्या प्रलंबित थकबाकीकरिता देखील उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

व्यापारातील अनेक प्रश्नांना एकच उत्तर: अभय योजना 2022

अपिलातील प्रलंबित थकबाकीचा पाठपुरावा करण्यात सर्वसामान्य व्यावसायिकाचा व्यवसायातील बहुमूल्य वेळ व पैसा नाहक खर्च होत असतो. थकबाकीला स्थगिती नसेल तर स्थावर व जंगम मालमत्ता लिलावात निघण्याची टांगती तलवार सतत डोक्यावर असते. तशातच कोरोना टाळेबंदीमुळे व्यापारावरील अनिष्ट परिणाम व ढासळलेले अर्थगणित. त्यामुळे व्यापारी वर्गाने या नामी संधीचे जोरदार स्वागत केले आहे.

त्यामुळे अपिलात होणारा वेळेचा व पैशाचा अपव्यय तसेच विभागाकडून होणारी वसुलीची कार्यवाही टाळण्यासाठी अभय योजनेत सहभागी होऊन जीएसटी कारकिर्दीत व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यावर अनेकांनी भर दिल्याचे या योजनेच्या प्रतिसादावरून दिसून आले आहे.

अगदी 1970 सालापासूनच्या सुद्धा प्रलंबित थकबाकीसाठी या योजनेत अर्ज सादर केले गेले आहेत, हे विशेष. त्याचप्रमाणे विक्रीकर न्यायाधिकरण अथवा उच्च न्यायालयातील देखील प्रलंबित दावे मागे घेत अनेकांनी या योजनेचा लाभ घेणे पसंत केले आहे. सर्व वर्गातून लाभत असलेल्या या प्रतिसादावरून ही योजना व्यापारीभिमुख आहे व या योजनेत यापूर्वीच्या सर्व अभय योजनांचे विक्रम मोडले जातील हे सुस्पष्ट आहे.

सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे ही अभय योजना 30 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे योजनेच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित थकबाकीदारांपैकी अधिकाधिक व्यापारी बंधूनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जीएसटी विभागामार्फत करण्यात आले आहे.

NewsToday24x7

Next Post

जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबवावे - जिल्हाधिकारी राजीव निवतकर

Sat Sep 24 , 2022
मुंबई :-  प्राणी क्लेष प्रतिबंधक कायद्याची जिल्ह्यात सर्वदूर प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. दि. 4 ऑक्टोबर रोजी जागतिक प्राणी दिनाचे औचित्य साधून शहरी व ग्रामीण स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करणारे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीचे अध्यक्ष राजीव निवतकर यांनी दिल्या. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची जागतिक प्राणी दिन साजरा करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com