– एनजीएसपी पोर्टलवर घेतली जातेय नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल
मुंबई :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल (cVIGIL) हे ॲप सुरू केले आहे. तर नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे. सी –व्हिजिल या ॲपच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्ह्यांअंतर्गत असलेल्या लोकसभा मतदारसंघात १६ मार्च ते ५ मे पर्यंत १२३ तक्रारी प्राप्त झाल्या.या सर्व तक्रारीचे जिल्हा निवडणूक विभागाकडून निवारण करण्यात आले आहे. तसेच एनजीएसपी पोर्टलवर नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल घेतली जात आहे.
नागरिकांना निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करता येते. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करण्यात येते. १६ मार्च ते ५ मेपर्यंत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ७२ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ५१ तक्रारी सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात.https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर १६ मार्च ते दि. ५ मे २०२४ या कालावधीत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८९३ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८४८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८३१ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८३७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित २८ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे, वरील ॲप/पोर्टलवर केलेल्या तक्रारीबाबत काय कार्यवाही झाली याची माहिती तक्रारदारास त्याचे लॉगीनमध्यॆ पाहता येते अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून दिली आहे.