नागपूर : नागरिकांच्या मुलभूत तक्रारींच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे झोनस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण कक्षांना ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ म्हणून कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून गुरुवारी 4 ऑगस्ट पर्यंत झोन स्तरावर नागरी समस्या निवारण केंद्रांमध्ये 856 तक्रारी प्राप्त झालेल्या असून आतापर्यंत दहाही झोनमधील 593 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
नागरिकांना भेडसावणाऱ्या सिवेज, पाणी, स्वच्छता, पथदिव्यांबद्दलच्या तक्रारी नोंदविण्यासाठी नागरी समस्या निवारण केंद्र उघडण्यात आले आहे. त्याचा फायदा आज नागरिकांना होताना दिसून येत आहे.
आतापर्यंत लक्ष्मीनगर झोनमध्ये प्राप्त एकूण 164 तक्रारी मधून एकूण 58 तक्रारी, धरमपेठ झोनमधील 87 तक्रारींपैकी 84 तक्रारी, हनुमाननगर झोनमधील 272 तक्रारीपैकी सर्व 266 तक्रारी, धंतोली झोनमधील 91 तक्रारीपैकी 36 तक्रारी, नेहरुनगर झोनमधील 72 तक्रारीपैकी 48 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच गांधीबाग महाल झोनमधील 43 तक्रारीपैकी 33 तक्रारी, सतरंजीपूरा झोनमधील 45 तक्रारीपैकी 26 तक्रारी, लकडगंज झोनमधील 09 तक्रारीपैकी 07 तक्रारी, आसिनगर झोनमधील 55 तक्रारीपैकी 23 तक्रारी, मंगळवारी झोनमधील 18 तक्रारीपैकी 12 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित झोन कार्यालयात नोंदवून मनपाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.