नागपूरसह एस.एन.डी.टी. मुंबई, रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, भारती विद्यापीठ पुणे संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेकरीता पात्र
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या अंतिम सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर संघ विजेता ठरला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर संघाने साखळी सामन्यातील सर्व सामने जिंकून 6 गुण प्राप्त करुन प्रथम क्रमांक मिळविला, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई व्दितीय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, तृतीय स्थानी, तर भारती विद्यापीठ, पुणे संघ शून्य गुण घेऊन चतुर्थ स्थानी राहिला.हे चारही संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेकरीता पात्र ठरले असून पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये संपन्न होणा-या स्पर्धेत ते पश्चिम विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
विजेत्या संघांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पद्माकरराव देशमुख, पंच निर्णायक प्रमुख सतिश डफडे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरीत करण्यात आले.
स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी प्र- कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी ए.आय.यू. ने विद्यापीठावर सोपविलेल्या आयोजनाच्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त करुन क्रीडा विभागाने एका वर्षात व्हॉलीबॉल व कबड्डी यासारख्या लोकप्रीय खेळांचे आयोजन करुन सुमारे 150 विद्यापीठांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये लावलेल्या हजेरीबद्दल विभागाचे कौतूक केले.सहभागी विद्यापीठातील प्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी उपलब्ध करुन दिलेल्या विविध सुविधांचे कौतूक करुन भविष्यातही अशाच प्रकारचे आयोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विद्यापीठाच्या या आयोजनाकरीता कबड्डी संघटनेव्दारे पात्र पंच उपलब्ध करुन दिल्याबद्दल जितेंद्र ठाकूर आणि सतिश डफडे यांचे आयोजन सचिवांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन डॉ. अविनाश असनारे यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते नियुक्त करण्यात आलेले पंच व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धा यशस्वीतेकरीता डॉ. उमेश राठी, डॉ. कल्याण मालधुरे, डॉ. आतीश मोरे, डॉ. डी.व्ही.रुईकर, श्री वसंत ठाकरे यांचेसह संलग्नित महाविद्यालयातील क्रीडा संचालकांनी योगदान दिले.