नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १११ वा दीक्षांत समारंभ शनिवार, दि. २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिम बाग, नागपूर येथे संपन्न होत आहे. या समारंभाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहेत. अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस भूषवतील. दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मा. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे स्वागतपर प्रास्ताविक भाषण सादर करतील. याशिवाय या समारंभाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य तसेच सर्व विद्याशाखांचे सन्माननीय अधिष्ठाता उपस्थित राहणार आहेत.
परीक्षा/ पदवी/पदविकाधारक
विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाले असून हे शैक्षणिक वर्ष शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालये आणि पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सातत्याने होत आहे. मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्याचे कार्य विद्यापीठ करीत असून यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हिवाळी २०२२ व उन्हाळी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. दीक्षांत समारंभात माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे.
या दीक्षांत समारंभामध्ये ७९,४४७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. संलग्नित महाविद्यालयांतील पात्र पदवीकांक्षींची ( डिग्री सर्टिफिकेट) विद्याशाखा निहाय संख्या : विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा – २९,६४१, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा – १९८४३, मानव विज्ञान विद्याशाखा – १९३१२, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा – ३९५१, स्वायत्त महाविद्यालये – ६४००, पदविका प्रमाणपत्र – ३००
पदके / पारितोषिके. :
या दीक्षांत समारंभात परीक्षेमध्ये स्पृहणिह यश संपादन केल्याबाबत विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेतून डि.एससी. पदवी प्राप्त करणारे डॉ. रामचंद्र हरीसा तुपकरी आणि डॉ. टि. व्ही. गेडाम सुवर्णपदक आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थिनी राजश्री ज्योतीदास रामटेके हिला माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.
आचार्य पदवीधारक
विद्यापीठाअंतर्गत शिक्षक व संशोधक विद्यार्थी संशोधनाचे कार्य करतात. या दीक्षांत समारंभात विद्या शाखा निहाय १२९ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत ६०, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत २१, मानवविज्ञान विद्याशाखेत ३६, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेत १३ आदींचा समावेश आहे.
दीक्षांत समारंभाचे संकेतस्थळावर लाईव्ह प्रक्षेपण
एकशे दहाव्या दीक्षांत समारंभाचे विद्यापीठ युट्यूब चॅनेल वरून सकाळी ९ वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यामुळे विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ लाईव्ह बघण्याची सुविधा जगभरातील सर्व संबंधित विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध होईल.
आपण सर्व सन्माननीय पत्रकार आजच्या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना आपण सातत्याने व्यापक प्रसिद्धी दिली आहे. विद्यापीठाची प्रतिमा उंचाविण्यासाठी आपण सर्वांचे महत्त्वपूर्ण सहकार्य अपेक्षित आहे. दीक्षांत समारंभाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी मी विद्यापीठातर्फे आपणास आमंत्रित करीत आहे.
पत्रकार परिषदेला मा. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल उपस्थित होते.