नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या वतीने सीताबर्डी येथील इंटरनिटी मॉलमध्ये शनिवारी (ता.25) रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत ‘अर्थ अवर’ साजरा करण्यात आला. या अभियानात मॉल मधील सुमारे 70 टक्के विद्युत उपकरणे बंद करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी मॉलमधील दुकानदार, ग्राहक आणि शहरवासीयांना ग्लोबल वार्मिंग, जल-वायू परिवर्तन, ऊर्जा बचत आदी बाबत जनजागृती करीत पर्यावरण संरक्षणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘अर्थ अवर’ दरम्यान माजी महापौर नंदा जिचकार, माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय मानकर, ग्रीन व्हिजिलचे कौस्तभ चटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, इंटरनिटी मॉलचे सर्वेसर्वा रामस्वरूप सारडा, राजेश सारडा, रजत सारडा, लक्ष्य सारडा, आशीष बराई प्रामुख्याने उपस्थित होते.
अर्थ अवर ही वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.) द्वारे आयोजित एक जागतिक मोहिम आहे. पृथ्वीशी बांधिलकीचे प्रतीक म्हणून रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत एका तासासाठी अनावश्यक वीज उपकरणे बंद ठेवण्यास प्रोत्साहित करून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ही मोहिम प्रथम साजरी करण्यात आली.
अर्थ अवर या संकल्पनेने प्रेरित होऊन नागपूर महानगरपालिकेचे तत्कालीन महापौर अनिल सोले यांनी ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने 2014 मध्ये पौर्णिमा दिवस मोहिम सुरू केली. तेव्हापासून हा कार्यक्रम प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आयोजित केला जातो, ज्यामध्ये नागरिकांना रात्री एक तासासाठी अनावश्यक विद्युत उपकरणे बंद ठेवण्याची विनंती केली जाते.
अर्थ अवर मोहिमेदरम्यान, इंटरनिटी मॉलमधील सुमारे 70 टक्के दिवे बंद करण्यात आले होते. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सदस्यांनी हवामान संकट, वाढते तापमान, ऊर्जा संकट, आणि हवामान बदल यांचा सामना करण्याची आवश्यकता आणि उपाय यासारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधला.