बालविवाह प्रथा नष्ट करण्यासाठी जनजागृती करावी  – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नागपूर : बालविवाह प्रथा नष्ट करण्यासाठी शाळेत नियमित शपथ घेण्यात यावी. यामुळे बालमनावर संस्कार होऊन बालविवाह योग्य नाही, हे मुलांना कळेल. त्यासोबतच बसस्थानक व मोक्याच्या ठिकाणी याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यांनी दिल्या.

चाईल्ड लाईन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. चाईल्ड लाईन समितीचे संचालक केशव वाळके, जिल्हा प्रतिनिधी श्रध्दा टल्लू, बालकल्याण मंडळाच्या अध्यक्ष छाया राऊत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, समितीचे सदस्य व वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

पोलीस विभागाने समिती सदस्यांना पोक्सो मधील केसेसमध्ये योग्य सहकार्य करून बालविवाहास आळा घालण्याच्या प्रक्रियेस गती दयावी. मुलींसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने करावी. कोरोना महामारीत पालक गमावलेल्या मुले शिक्षणापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्या, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

बालविवाह प्रथेविरुध्द तसेच ‘चांगला व वाईट स्पर्श’ या विषयावर पुस्तिका तयार करून शाळा, ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागात जनजागृती सोबतच जिंगल्सद्वारे जनजागृती करा, सूचना त्यांनी दिल्या.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com