प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपची सुरुवात ; पत्रकारितेत शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना होणार फायदा

मुंबई :-  प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपची सुरुवात झाली आहे. पत्रकारितेत शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. बारामती येथे मान्यवरांच्या हस्ते प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपच्या पोस्टरचे प्रकाशन करून शुभारंभ झाल्याची घोषणा ‘व्हॉईस ऑफ मीडिया‘चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केली.

यामुळे पत्रकारितेत शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करणाऱ्या देशपातळीवरील संघटनेची दोन दिवसीय कार्यशाळा व चिंतन बैठक ११ व १२ मार्च रोजी बारामती येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पत्रकारितेमध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या युवकांसाठी “प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिप” ची घोषणा करण्यात आली. राज्यभरातून निवड करण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. ज्या पुरी सरांनी आयुष्यभर पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या युवकांसाठी आपले आयुष्य वेचले. त्या पुरी सरांना या निमित्ताने गुरु वंदन होणार आहे. निःस्वार्थी सेवा करा, तुम्हाला निसर्ग फळ देईल, हा गुरुमंत्र प्रा. सुरेश पुरी यांनी अनेक पत्रकारिता करणाऱ्या युवकांना दिला आहे.

कोण आहेत प्रा.सुरेश पुरी?

प्रा. सुरेश पुरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. देशभरातील शेकडो पत्रकार, जनसंपर्क अधिकारी आणि संपादकांचे गुरू म्हणून प्रा. सुरेश पुरी यांची ख्याती आहे. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलासारखे शिकवणाऱ्या प्रा. सुरेश पुरी यांनी अनेक माध्यमांतून सातत्याने लिखाण केले आहे. या वयातही शेकडो विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरेश पुरी यांनी त्यांचा शिक्षकी पेशा कायम ठेवला आहे. त्यांची अनेक पुस्तके ही आहेत. इतरांना मदत करायची, त्यातून कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. आपल्या मदतीतून आपला शिष्य उभा कसा राहील याची सातत्याने काळजी घेणाऱ्या प्रा.सुरेश पुरी यांच्या नावाने व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारितेत शिक्षण घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप सुरू करण्यात येत आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने ३ लाख रुपयांची ही स्कॉलरशिप राहणार असून निवडप्रकियेतून पात्र ठरलेल्या गरजू विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याचे बारामतीच्या बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय महिला संघटक सारिका महोत्रा, प्रदेशाध्यक्ष राजा माने, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष (ग्रामीण) अनिल म्हस्के पाटील, कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, बालाजी मारगुडे, संजय मालाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला

अशी होणार विद्यार्थ्यांची निवड..!

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रा. सुरेश पुरी स्कॉलरशिपसाठी पत्रकारितेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेतून राज्यभरातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात येईल. व्हॉईस ऑफ मीडियाच्या

www.voiceofmedia.org संकेतस्थळावर या स्कॉलरशिप संदर्भातील निवड प्रक्रिया व इतर माहिती वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या माहितीचा उपयोग पत्रकारितेमध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन करण्यात आले. अधिक माहितीसाठी 98674 54144 हा संपर्क नंबरही आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com