संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- ग्रामसेवक हा गाव आणि सरपंचामधील विकासात्मक दुवा समजला जातो.कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बहुतांश ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसून खाजगी वाहनाने वा लांब पल्याच्या ठिकाणाहून अप डाऊन करताहेत त्यामुळे गावविकासाला खीळ बसने सहजच आहे तेव्हा अशा परिस्थितीत गावाचा विकास कसा साधणार?असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून याला येथील ग्रामसेवकांना वरिष्ठांचा अभयपणा कारणीभूत असल्याचे दिसून येते.
नागपूर जिल्हा परिषद मार्फत कामठी तालुक्यातील ग्रामपंचायतीत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
कल्याणकारी शासन म्हणून या सेवा ग्रामीण भागातील जनतेला सर्वकाळ उपलब्ध होतील असे शासनाकडून पाहिले जाते यासाठी जिल्हा परिषद मार्फत नियुक्त केल्या गेलेल्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे मात्र मात्र बरेच ग्रामसेवक गावातील मुख्यालयात राहत नसून मुख्यालयी राहत असल्याचे खोटे दाखले तयार करून शासनाची दिशाभूल करतात व वरिष्ठ अधिकारी यांना खतपाणी देतात.
गावपातळीवर ग्रामसेवकांना गावाचा सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे बंधनकारक असल्याचा ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय ही घेतला आहे मात्र त्या निर्णयाची पायामल्ली कामठी तालुक्यात होताना दिसत आहे.याकडे वरिष्ठांचे होणारे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.