संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
साथीच्या आजाराला आला वेग, रुग्णालये होताहेत हाऊसफुल
कामठी ता प्र 7:-कामठी तालुक्यात मागील एक महिन्यात सतत चांगलाच पाऊस आला याचा परिणाम आरोग्यावर होत असून व्हायरल फिव्हर चा उद्रेक सुरू आहे या व्हायरल इन्फेक्शनमुळे तापाच्या रुग्णात वाढ होत आहे.विशेषता लहान मुले व वयाधीन नागरिकाना या वातावरणाचा त्रास जाणवत असून शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय तसेच खाजगी दवाखान्यात वयाधीन नागरिक तसेच बालकांची गर्दी वाढलेली दिसत असून या रुग्णांमुळे दवाखाने हाऊसफुल होत चालले आहेत.
मागील काही दिवसापासून पावसाचा तडाखा असून कधी पाऊस तर कधी ढगाळ वातावरण असल्यामुळे पूर्वी उष्ण असलेल्या वातावरणात बदल झाल्याने तालुक्यात साथरोगाने डोके वर काढले आहे तर सातत्याने होत असलेल्या वातावरणात बदल झाल्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे .या बदलत्या हवामानामुळे मलेरिया, कावीळ, टायफाईड, सर्दी, खोकला अशा जलजन्य व संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना त्रास होत असून थंडी, ताप, टायफाईड यासारखी लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येत आहेत .अश्या वातावरणात नागरिकांना या आजारामुळे हातातील कामे बाजूला सारून आधी रुग्णालय गाठावे लागत आहेत यामुळे रुग्णालयात नेहमीपेक्षा अधिक रुग्णसंख्या दिसून येते.तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी वाढली आहे.खाजगी रुग्णालयात ओपिडीही फुल आहेत.प्रत्येक रुग्णालयाला जणू काही जत्रेचे स्वरूप आले आहे .पावसाळ्यात निर्माण झालेला वातावरण आणि दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे आजार बळावले आहेत यामुळे ताप, उलट्या, पोटदुखी सारख्या आजारात वाढ होत आहे.बालकांची सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे.कोणत्याही स्वरूपाचा ताप असल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे अन्यथा याचे दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
डॉ शबनम खानुनी :- नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी यांनी सांगितल्यानुसार साधी सर्दी, ताप, खोकला म्हटला की अनेक रुग्ण औषधी दुकानातून परस्पर गोळी घेऊन मोकळे होतात, आराम न पडल्यास पुन्हा एक दोन वेळा परस्पर गोळ्या घेण्याच्या नागरिकांमध्ये सवयी आहेत मात्र कोणतीही औषध घेण्यापूर्वी किमान आपली लक्षणे आणि औषधी याची डॉक्टरांना माहिती देत त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावे तसेच आजार टाळण्यासाठी पाणी उकळून व गाळून प्यावे.शिजवलेले व ताजे अन्न खावे, साचलेल्या पाण्यातून जाणे टाळावे, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रोटिनयुक्त आहार घ्यावा, घराच्या परिसरात वयक्तिक स्वछता ठेवावी , नागरिकांनी कचरा उघड्यावर न टाकता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.