आपली लढाई लोकशाही मुल्यांची जपणूक करण्यासाठी – जयंत पाटील

राष्ट्रवादी डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक पार : डॉ. सुनील जगताप यांची सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर सेल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक नवनवीन उपक्रम राबवून मावळते प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी ही संघटना वाढवली. आता डॉ. सुनील जगतापही त्याच जोमाने काम करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

डॉक्टर, वकील हे शिक्षित वर्ग लोकांचे मत परिवर्तन करू शकतात. मधल्या काळात आपल्या डॉक्टर सेलने अतिशय चांगली कामगिरी केली, महापूर असो की कोविड, डॉक्टर सेल सेवा करण्यात सर्वात पुढे होता. डॉक्टर सेलने मोफत शिबिरे घेऊन सामान्य लोकांना मदत केली असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले

डॉक्टर सेलच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांना पटवून द्यावी. हे करण्यासाठी आपल्याला उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच तयार करायला हवा. जास्तीत जास्त डॉक्टर आपल्या संघटनेशी कसा जोडता येईल याची काळजी घ्यावी असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com