मार्कंडादेव येथे भारत सरकारच्या विविध योजनांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन

– खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार उद्घाटन

– माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय,पुणे व क्षेत्रीय कार्यालय वर्धाचा उपक्रम

गडचिरोली : भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, विभागीय कार्यालय, पुणे, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, गडचिरोली व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली यांच्या सहकार्याने दिनांक १७ फेब्रुवारी पासून २१ फेब्रुवारी पर्यंत चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे शासकीय योजनांवर आधारित भव्य मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा परिसरात आयुष्यमान भारत, आंतरराष्ट्रीय पोषक धान्य वर्ष २०२३, सरकारच्या विकासाचे आठ वर्ष, जी२० व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयांवर भव्य मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खासदार अशोक नेते यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवराव होळी, पद्मश्री परशुराम खुणे, जिल्हाधिकारी संजय मीणा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक कुमार चिंता, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे, केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा क्षेत्रीय कार्यालय नागपूरचे सहायक संचालक हंसराज राऊत, गटविकास अधिकारी सागर पाटील, तहसिलदार संजय नागटिळक उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात भारत सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती सांगणारे सचित्र छायाचित्र प्रदर्शन, तसेच डिजीटल वॉल, एलएडी टिव्हीवर चलचित्र स्वरूपात माहिती असणारे विविध चित्रपट/माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. याचबरोबर भारत सरकारच्या पब्लिकेशन डिव्हीजन व जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोलीद्वारे पुस्तकांचे प्रदर्शनही राहणार आहे. आरोग्य विभाग, गडचिरोली मार्फत नागरीकांसाठी आरोग्य शिबिर राहणार आहे. तसेच आरोग्याची माहिती सांगणारे विविध स्टॉल या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. तसेच सरकारी विभागांमार्फत सरकारी योजनांची माहिती सांगणारे स्टॉल राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठातील एनएसएसचे विद्यार्थी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत. महिला व आर्थिक विकास महामंडळाद्वारे बचत गटातील महिलांसाठी आणि महिला व बालविकास विभाग, जि.प. गडचिरोली मार्फत अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यासाठी पौष्टिक आहार स्पर्धा राहणार आहे.

सदर १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन नागरीकांसाठी निःशुल्क असून नागरीकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा यांच्याद्वारे करण्यात आले आहे.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com