उद्योग गुंतवणुकीच्या विदर्भातील संधी

जी-२० परिषदेंतर्गत नागपूर येथे नागरीसंस्थाची सी-20 परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेला विविध देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. परिषदेच्या निमित्ताने नागरी समुहाच्या उत्थासाठी विविध विषयांसह औद्योगीक गुंतवणूक व विकासाच्या संधीवर देखील विचारमंथन होणार आहे. नागपुरात होणारी ही परिषद विदर्भाच्यादृष्टीने महत्वपूर्ण आहे. येथील कृषी, मत्सव्यवसाय, खनिज संपत्ती, वस्रोद्योग, वनसंपदा व पर्यटनआदी क्षेत्रात उद्योगाच्यादृष्टीने महत्वाच्या बलस्थानांचा मागोवा घेणारा लेख.

पूर्व व पश्चिम अशा दोन भौगोलिक भागात विस्तारलेल्या विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कृषी हा कणा आहे. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत येथे सरासरी पर्जन्यमान समाधानकारक आहे. पश्चिम विदर्भात कापूस, तूर, सोयाबीन आदि पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात तसेच फळपिकांचे क्षेत्रही वाढत आहे. त्यामुळे कापसावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगांना आणि फळप्रक्रीया उद्योगांना येथे मोठ्या संधी आहेत. पूर्व विदर्भात भाताचे मोठे उत्पादन होत असल्याने भातावर आधारित कृषी उद्योगाला येथे चालना मिळत आहे. सोयाबिनचे प्रक्रीया उद्योगालाही येथे मोठा वाव आहे. तब्बल २ लाख ५० हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पामुळे तसेच इतर सिंचन प्रकल्पामुळे या भागातील कृषी क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. विदर्भात वैविध्यपूर्ण फळे, भाजीपाला, पशुखाद्य व दुग्धव्यवसायाची क्षमता चांगली आहे. एकंदरित कडधान्य, दुग्धशाळा, बीजप्रक्रीया, सोयाबीन प्रक्रिया, तांदुळ, वनउपज, रेशीम उत्पादन, सोयाबीन व कापूसावरील प्रक्रिया उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत.

पूर्व विदर्भात वैनगंगा, वर्धा, कन्हान, पेंच, आदि मोठ्या नद्या तसेच ‘माजी मालगुजारी तलाव’ मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे जलसाठ्यांचा वापर मत्स्यव्यवसायासाठी उपयुक्त ठरत आहे. भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात झिंगे उत्पादन होत आहे. दळणवळणाच्या सोयी उपलब्ध असल्यामुळे देशाच्या सर्वच भागात मत्स्यउत्पादन पाठवणे सुलभ होत आहे. हा व्यवसाय विदर्भातील व्यावसायिकांसाठी व मत्स्यउत्पादकांसाठी संधी ठरत आहे.

खनिज संपत्ती

महाराष्ट्राच्या एकूण खनिजधारण क्षेत्रात नागपूर विभागात ६० टक्के तर अमरावती विभागात १० टक्के असा एकूण ७० टक्के वाटा आहे. विदर्भाचा समावेश असणाऱ्या मध्य भारताचा खनिज पट्टा भारतातील दुसरा मोठा खनिज पट्टा आहे. या भागात मॅंगनीज, बॉक्साईट, युरेनियम, चुनखडी, संगमरवर, कोळसा, हिरे, अभ्रक आणि ग्राफाईट इत्यादी खनिजे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. पर्यावरणाचा योग्य मेळ घालून या खनिज संपत्तीचा वापर उद्योगांसाठी करता येऊ शकतो.

वस्रोद्योग

विदर्भात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून प्रक्रिया उद्योगासाठी शासनाने प्रोत्साहन दिले आहे. अमरावती येथे स्वतंत्र टेक्स्टाईल पार्क सुरू झाला असून येथे रेमंडसह इतर उद्योगांचे उत्पादने सुरू झाली आहेत. नागपूर, यवतमाळ, अकोला आदि जिल्ह्यांतही कापसावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना चालना मिळत आहे. वस्त्रनिर्मिती उद्योगाच्या संधी वाढत असल्यामुळे उद्योजकही आकर्षित होत आहेत. नागपूर येथे इंडोरामाचा मोठा प्रकल्प सुरू असून यावर आधारित छोट्या उद्योगांनाही प्रोत्साहन मिळत आहे.

वस्र निर्मिैतीसाठी आवश्यक लांब धाग्याच्या कापसाचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश विदर्भ आहे. विदर्भातील यवतमाळच्या कळंब तालुक्यात गृत्समद ऋषींनी कापसाचा शोध लावल्याचे सांगितले जाते. येथील कापसाची उत्पादकता पाहून 1877 मध्ये जमशेदजी टाटा यांनी भारतातील पहिली कापड गिरणी ‘सेंट्रल इंडिया स्पिनींग अॅण्ड विविंग कंपनी लिमिटेड’ या नावाने नागपूर येथे सुरू केली होती. याचवेळी राणी व्हिक्टोरिया यांना भारताची एम्रेस अर्थात सम्राज्ञी घोषित करण्यात आले, त्यामुळे ही कापड गिरणी ‘एम्प्रेस मिल’ या नावानेही ओळखली जाते. ‘वऱ्हाड अन् सोन्याची कऱ्हाड’ म्हणून ख्याती असलेल्या या भागातील कापसाचे उत्पादन व उपयोगिता पाहता इंग्रजांनी 1903 मध्ये विदर्भात रेल्वे मार्ग (शकुंतला रेल्वे) जोडून येथील कापूस इंग्लंडमधील मँचेस्टरपर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली होती.राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे मुख्यालय नागपूरात आहे. या भागात कापूस ते कापड ही संकल्पना साकार होत असून याअंतर्गत विणकाम, रंगकाम, तयार कपडे आदीं उद्योग उभारणीलाही मोठा संधी आहे.

पर्यटन उद्योगाच्या संधी

नागपूरच्या जवळ २५० किलोमीटच्या परिसरात विदर्भ व मध्यप्रदेशात मिळून एकूण ८ व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामुळे नागपूला ‘टायगर कॅपिटल’ ही ओळख मिळाली आहे. वनपर्यटनाच्या बाबतीत जागतिक नकाशावर ताडोबा ने जागा पटकावली आहे. मागील काही वर्षात विदर्भातील जंगलात वाघांचे विशेष संवर्धन करण्यात आल्याने वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हमखास व्याघ्र दर्शनासाठी विदर्भाकडे पाहिल्या जाते. देश-विदेशातील पर्यटकांची येथे नियमित रेलचेल असते. यासोबतच विदर्भातिल गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे, पुरातन वास्तू व धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे येथे देखील हौशी पर्यटक व भाविकांचा ओघ असतो. येणाऱ्या पर्यटकांची व्यवस्थीत सोय व आदरातिथ्य आधारित उद्योगांना देखील येथे मोठ्या संधी आहेत.

विदर्भात ग्रामीण, शहरे व राज्यांना जोडणारे चांगल्या रस्त्यांचे आणि रेल्वे मार्गांचे संपर्क जाळे आहे. यासोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानप्रवास व मालवाहतूकीची सुविधा उपलब्ध आहे. उद्योगांना चालना देणारी संपर्क यंत्रणा, रस्ते, वीज, कुशल मनुष्यबळ इ. पायाभूत सुविधा येथे उपलब्ध आहे. विदर्भ हा भारताच्या मध्य भागात येत असल्याने कोणत्याही दिशेने आपले उत्पादन व सेवा पोहचविण्यासाठी कमी वेळ आणि कमी खर्च लागतो. विदर्भाचे भौगोलिक स्थान व उपलब्ध पायाभूत सुविधा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उपयुक्त असल्याने विदर्भात उपरोक्त क्षेत्रात उद्योग गुंतवणूकीसाठी मोठ्या संधी आहेत.

– गजानन जाधव, माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क, नागपूर.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com