‘मराठी विश्वकोश : स्वरूप आणि परंपरा ‘ या विषयावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आज एक दिवसीय कार्यशाळा

अमरावती :- महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या अधिसभागृहात आज (१५ ऑक्टोबर ) वाचन प्रेरणा दिवसाचे औचित्य साधून ‘ मराठी विश्वकोश : स्वरूप आणि परंपरा ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप मालखेडे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होईल. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक डॉ. प्रभा गणोरकर यांचे बीजभाषण होईल . विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ.शामकांत देवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील..

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ( १५ ऑक्टोबर ) सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून हे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर मराठी विश्वकोशासाठी लिहिलेल्या नोंदींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल यामध्ये

१. पटवर्धन, शिवाजीराव

२. जिचकार, श्रीकांत

३. वाघ, विठ्ठल

४. सत्यपाल महाराज ,

५. देशमुख, सदानंद

६. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

या सहा नोंदींचा समावेश असून मराठी विश्वकोशाच्या https://marathivishwakosh.org या संकेतस्थळावर मान्यवरांच्या हस्ते त्यांचे प्रकाशन होईल. दुपारी १२.३० ते २.०० मध्ये होणाऱ्या सत्रात ‘मराठी विश्वकोश : स्वरूप आणि परिचय ‘ या विषयावर संतोष ग्या.गेडाम (विद्याव्यासंगी, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) हे भाष्य करतील. तसेच ‘मराठी कोश नोंदलेखन : पद्धती आणि कोश रचनाशास्त्र ‘ या विषयावर डॉ.जगतानंद भटकर (विद्याव्यासंगी, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ) हे मार्गदर्शन करतील. दुपारी २.४५ ते ३.४५ मध्ये होणाऱ्या सत्रात ‘मराठी विश्वकोशातील नोंदलेखन पद्धती ‘ या विषयावर प्रा. डॉ. अजय देशपांडे आणि प्रा. भगवान फाळके हे भाष्य करतील. समारोपीय सत्रात प्राचार्य. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांची प्रमुख उपस्थिती राहील. अतिशय महत्त्वाच्या विषयावरील या कार्यशाळेला इच्छुकांनी उपस्थित रहावे असे आवाहन विद्यापीठाच्या मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा मराठी विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com