यवतमाळ :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील १६ मे रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षाचे घोषवाक्य तपासा, स्वच्छ करा आणि झाकूण ठेवाः डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा असे आहे. नागरिकांनी डेंग्यू व किटकजन्य आजारांपासून बचावासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यांमध्ये जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या नियंत्रणाखाली किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. यावर्षी जानेवारी ते एप्रिल पर्यंत डेंग्यु आजाराचे ३२ रुग्ण आढळुन आलेले आहे. डेंग्यू निश्चित आजाराने एकही मृत्यु झाला नाही. जिल्ह्यातील किटकजन्य आजाराकरीता जी गावे अतिसंवेदनशिल आहेत अशा गावामध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे. या गावामध्ये कायम स्वरुपी व तात्पुरती डासोत्पत्ती स्थानांचा शोध घेऊन त्यामध्ये गप्पीमासे सोडण्याची धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.
डेंग्यु ताप हा अर्बो व्हायरसमुळे होतो व विषाणूचा प्रसार एडिस इजिप्ती या डासाच्या मादीमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांचे पायांवर तसेच पोटावर पांढरे पट्टे असतात. म्हणून या डासाला टायगर मॉस्कीटो या नावाने ओळखतात. एडिस ईजिप्ती बहुधा दिवसा चावतात. विविध साधनांमार्फत कुठेही जाऊ शकतात. साठविलेले पाणी, रांजण, पाण्याची टाकी, कुलरमधील पाणी, टाकाऊ वस्तूंमधील जमा झालेले पाणी, नारळाच्या करवंट्या, कुंडी इत्यादी मध्ये अंडी देतात. डांस हा एका वेळी २५० ते ३०० अंडी घालतात. हा डांस दिवसा एकाचवेळी अनेक व्यक्तीना चावतो.
लक्षणे : एकाएकी तीव्र ताप येऊन तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायुदुखीचा त्रास उद्भवतो, उलटी होतात. दुसऱ्या दिवसांपासुन तिव्र डोळेदुखी व अशक्तपणा जाणवतो. भुक मंदावते. जास्त तहान लागुन तोंडाला कोरड पडते. ताप कमी-जास्त होऊन पुरळ येतात. नाकातुन रक्तस्त्राव होऊन, रक्ताची उलटी होणे, पोट दुखणे, व रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाची शौच्छास होणे तसेच रुग्ण बेशुद्धावस्थेत जातो.
निदान : रुग्णांचा रक्तजल नमुना घेऊन तपासणीकरिता सेंटीनल सेंटर शासकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे एलायझा चाचणी निदान निश्चितीकरिता पाठविण्यात येतो.
उपचार : डेंग्यु तापामध्ये फक्त पॅरासीटॉमल गोळ्या वयोमानानुसार घ्याव्यात. ब्रुफेन, अॅस्पीरीन सारखी वेदनाशामक औषधे घेऊ नये. अतिशय घाम येऊन वारंवार उलट्या होणे जिभेला कोरड पडणे अशा परिस्थितीत क्षार संजीवनी द्रावणाचा वापर करावा व त्वरित नजिकच्या प्रा. आ. केंद्राशी किंवा आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा.
प्रतिबंध : एडिस डासांचे उत्पत्ती स्थाने रांजण, टाके, माठ, कुलरमधील पाणी इत्यादि रिकामी करावीत. रिकामी न करण्याजोगी भांड्यामधील पाण्यात टेमिफॉस द्रावणाचा वापर करावा. आठवड्यातील एक निश्चित दिवस कोरडा दिवस पाळावा. त्याचप्रमाणे डासांपासुन संरक्षण होण्यायोग्य कापडांचा वापर करावा. लक्षणे आढळल्यास नजीकच्या सरकारी रुग्णालयात जाऊन त्वरीत वैद्यकिय सल्ला व उपचार करावेत.
डेंग्यू आजार टाळण्यासाठी उपाययोजना :
डेग्यू डासांची उत्पत्ती पाण्यात होते, त्यामुळे टायर, फुटके कॅन, डबे यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या घराभोवती अथवा परिसरात पाणी साचू न देणे, वापरातील पाण्याची भांडी झाकून ठेवणे, साचलेली डबकी वाहती करणे, घराच्या खिडक्यांना डास विरोधी जाळ्या बसविणे, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावणे, घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करुन घासुन, पुसून, स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळणे. झोपतांना मच्छरदाणीचा वापर, पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसविणे. कायम स्वरुपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पीमासे सोडणे, असे उपाय करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.टी.ए.शेख यांनी केले आहे