सावनेर – योगेश कुंभेजकर सावनेर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विकासकामांची पाहणी जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात येत आहे. अद्याप लसचा पहिला डोस व दुसरा डोस न घेतलेल्या 18 वर्षावरील व्यक्तींच्या घरी भेट देवून या मोहिमेंतर्गत त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात लसीकरणाचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेवक आदींनी जबाबदारीपूर्वक काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज दिले.
सावनेर तालुक्यातील वेलतूर, पाटनसावंगी, पटकाखेडी व केळवद येथील ग्राम पंचायत व आरोग्य केंद्रांना भेट देऊन कोविड लसीकरण व विकासकामांचा आढावा श्री. कुंभेजकर यांनी आज घेतला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक गरुड, सावनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी योगेश इंगळे, उपविभागीय अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) रामदास गुंजरकर, विस्तार अधिकारी दिनेश सोमकुवर, सहा. कार्यक्रम अधिकारी प्रदीप बागडे, गट समन्वयक बबन श्रृगांरे, पाटनसावंगीचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत काथवटे, पटकाखेडीचे सरपंच सुधाकर बांदरे, सुनील इचे, सचिव संदीप जिवतोडे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना मात करण्यासाठी लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात कोविड लस उपलब्ध असून शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ठ साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणांना आदेश देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील एकही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये. यासाठी प्रशासनाव्दारे गावागावांत लसीकरण शिबिरांचे आयेाजन करण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतला नाही त्यांनी शिबिरात तसेच लगतच्या लसीकरण केंद्र, आरोग्य केंद्रात जाऊन लस घ्यावी. तसेच ज्या पात्र व्यक्तींनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही त्यांनीही जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लसीकरण करुन घ्यावे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन कोविड लसीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. कुंभेजकर यांनी केले.
सावनेर तालुक्यातील पाणी पुरवठा योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी श्री. कुंभेजकर यांनी केली. जलजीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के नळजोडणी झालेल्या गावांना जलयुक्त गाव घोषित करावे, असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वेलतुर, पटकाखेडी, पाटनसावंगी ग्राम पंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवड व सिंचन विहीरीच्या कामांची श्री. कुंभेजकर यांनी पाहणी केली. पाहणी दौराप्रसंगी त्यांनी मनरेगा कामावरील मजूरांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मजूरांच्या जॉब कार्डची प्रत अद्ययावत ठेवावी, कामाच्या ठिकाणी फलक लावावे, ग्रामपंचायत स्तरावर नमुना-4 भरून ठेवावा, 35 टक्के फळझाडे, वृक्ष लागवडीचे लक्षांक पूर्ण करावे तसेच सिंचन विहीर लाभार्थींना योजनेच्या अभिसरातून लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना श्री. कुंभेजकर यांनी संबंधितांना दिल्या.
दिनेश दमाहे ,9370868686