– अग्निशमन, विद्युत, उद्यान विभागाची चमू शहरभर कार्यरत
– जवळपास ४२ ठिकाणी झाड पडल्याच्या घटना
नागपूर :- गुरूवारी (ता.२०) सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण शहरात विपरीत परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या अनेक भागांमध्ये झाडे पडली, कुठे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, भिंत पडली, विद्युत तारा तुटल्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला, रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. अशा परिस्थितीतून मार्ग काढून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागाद्वारे गुरूवारी रात्रभर मदतकार्य करण्यात आले व परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले.
गोंडवाना चौक परिसरात झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सुद्धा मनपाच्या चमूने रात्री उशीरापर्यंत मदतकार्य करून जीवित व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने कार्य केले. आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी. पी. चंदनखेडेआणि सर्व सहायक आयुक्त यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन परिस्थितीची पाहणी केली व मनपाच्या चमूला अधिक वेगाने मदतकार्य करण्यास प्रोत्साहित केले. मनपाच्या विद्युत, अग्निशमन, उद्यान विभागासह अन्य विभागांच्या चमूद्वारे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये अहोरात्र सेवाकार्य बजावण्यात आले.
शहरात निर्माण होणा-या आपात्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज असून नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही स्थितीमध्ये सहकार्यासाठी मनपाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती द्यावी, असे आवाहन सुद्धा मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना केले.
गुरुवारी सायंकाळी वादळी पावसाला सुरुवात होताच मनपाचे आपात्कालीन नियंत्रण कक्षामध्ये मदतीसाठी नागरिकांचे फोन सुरू झाले. मनपाद्वारे मनपाचे आपात्कालीन संपर्क क्रमांक सुद्धा सोशल मीडियावरून वेळावेळी प्रसारीत करून नागरिकांना मदतीसाठी फोन करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांकडूनही त्यांच्या भागात झालेले नुकसान व निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती मनपापर्यंत पोहोचविण्यात येत होती. मनपाद्वारे संबंधित चमूला सदर माहिती देऊन घटनास्थळापर्यंत पोहोचविण्याबाबत मदत केली गेली. शहरातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत मनपाचे प्रत्येक भागात सेवाकार्य सुरू होते. अशा स्थितीत नागरिकांनी संयम बाळगून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन स्वत: मनपा आयुक्तांनी त्यांच्या ‘ट्वीटर’ अकाउंटवरून केले. मनपा आयुक्तांकडून वेळोवेळी शहरातील परिस्थितीचा आणि मदतकार्याचा आढावा घेतला जात होता.
फांदी/झाड पडलेल्या तक्रारींचे निराकरण
सुगत नगर अग्निशमन केंद्रांतर्गत जसवंत टॉकीज जवळ झाड पडले,प्लॉट क्र. ६ गिट्टीखदान ले-आऊट प्रतापनगर येथे MH ३१ cp ६५६३ मारुती सुझुकी गाडीवर झाड पडले. कपिलनगर बौद्ध विहार येथे झाड पडले, वर्धा ले- आऊट अंबाझरी तलाव येथे झाड पडले. आठ रास्ता चौक येथे झाड पडले, गिट्टीखदान ले-आऊट प्रतापनगर रोड येथे झाड पडले. तर गंजीपेठ अग्निशमन केंद्रांतर्गत गोळीबार चौक येथे झाडाची फांदी पडली, छत्रपती चौक पेट्रोलपंप समोर झाड पडले. रघुजीनगर पोलीस स्टेशन येथे झाड पडले, प्लॉट क्र. २९ वसंत नगर बजाजनगर पोलीस स्टेशन येथे झाड पडले. पत्रकार कॉलोनी वसंत नगर येथे झाड पडले. अभ्यंकर नगर येथे झाड पडले. तर कळमना अग्निशमन केंद्रांतर्गत मीनीमाता नगर पाच चोपडा चौक गल्ली क्र. ०५ येथील घरावर झाड पडले. कापसी उमीया अंगार येथे झाड पडले. त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्रांतर्गत लक्ष्मीनगर पोस्ट ऑफिस जवळ फांदी पडली. सुंदरवन ले- आऊट नरेन्द्र नगर येथे फांदी तुटली. नवनिर्माण सेना प्रतापनगर येथे झाड पडले. कोतवाल नगर कॅनरा बँक जवळ झाड पडले. सक्करदरा अग्निशमन केंद्रांतर्गत म्हाळगी नगर चौक येथे फांदी पडली. हल्दीराम हॉटेल अजनी येथे झाड पडले. सावरकर नगर ५५/५ ऑरेग सिटी हॉस्पीटल समोर झाड पडले. नरेंद्र नगर अग्निशमन केंद्रांतर्गत साईकृपा ट्रेडर्स गंगा कावेरी गोदावरी बिल्डिंग समोर झाड पडले. अशा जवळपास ४२ ठिकाणी झाड पडल्याची माहित मिळताच युद्धपातळीवर कार्य करीत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ता मोकळा केला.
आपात्कालीन मदतीसाठी येथे संपर्क साधा
आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात ०७१२ २५६७०२९, २५६७७७७, २५४०२९९, २५४०१८८ या क्रमांकांवर किंवा अग्निशमन केंद्राच्या १०१, १०८ आणि ७०३०९७२२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.