’सीएसआर’ कडून ‘सीएलआर’कडे वळण्याची गरज – न्या. भूषण गवई

– कार्डीफ येथील सीएमजीए परिषदेत मांडली भूमिका

नागपूर :- आपल्याला सीएसआर अर्थात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी)कडून आता सीएलआर अर्थात ‘कॉर्पोरेट लिगल रिस्पॉन्सिबिलिटी’ (कॉर्पोरेट कायदेशीर जबाबदारी)कडे वळण्याची गरज असल्याचे मत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. यूनायटेड किंगडम मधील कार्डीफ येथे कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट आणि जजेस असोसिएशन (सीएमजीए) परिषदेमध्ये ते बोलत होते.

सीएमजीए इंग्लंड आणि वेल्सच्या लॅटिमर हाउसच्या मार्गदर्शक तत्त्वांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १० ते १४ सप्टेंबर दरम्यान कार्डीफ येथे सीएमजी परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. ‘ओपन जस्टीस टूडे’ अशी सीएमजीए परिषदेची संकल्पना असून परिषदेत न्या. गवई यांनी ‘कॉर्पोरेट कायदेशीर जबाबदारी आणि वातावरण बदल’ या विषयावर भूमिका मांडली.

इंग्लंड आणि वेल्सच्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रॉबिन नोल्स सीबीई यांच्या अध्यक्षतेखाली सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात इतर पॅनेल सदस्यांमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोचे सरन्यायाधीश आयव्हर अची, गॅम्बियाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आवा बाह आणि एफबीए, इंग्लंड आणि वेल्सच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रा. सर रॉस क्रॅन्स्टन यांचा समावेश आहे.

सत्राला संबोधित करताना न्या. भूषण गवई यांनी वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणात होत असलेले बदल जगापुढील मोठे आव्हान असून त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्वांनी मिळून उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. भारत सरकार वातावरणातील प्रदूषण थांबविण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करीत आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही कॉर्पोरेट जगताला वेळोवेळी त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली तसेच अनेक निर्णयाद्वारे पर्यावरण कायद्याला बळ दिल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना न्या. भूषण गवई म्हणाले, ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ या संकल्पनेत व्यवसायांना त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांमध्ये सामाजिक आणि पर्यावरणीय चिंता एकत्रित करणे बंधनकारक आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी स्वयं-नियमनावर कार्य करीत कॉर्पोरेट्सना त्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी लवचिकता देते. ‘कॉर्पोरेट्स स्वेच्छेने पाठपुरावा करू शकतात’ ही नैतिक आणि मानक जबाबदारी म्हणून मुख्यत्वे या संकल्पनेत मानली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले.

NewsToday24x7

Next Post

संविधान चौकात आरबीआय बसस्टॉप 

Sat Sep 16 , 2023
नागपूर :- नागपुरात सर्वात महत्त्वाच्या असलेल्या रिझर्व बँक चौकाचे संविधान चौक म्हणून पाच वर्षांपूर्वी नामांतर करण्यात आले. आता या चौकाला संविधान चौक म्हणून मान्यता मिळाल्याने शासकीय, निमशासकीय, खाजगी अश्या सर्व प्रकारचे कार्यक्रम येथेच होत असतात. मग धरणे आंदोलन असो, निदर्शने असो, सभा संमेलन असो, मोर्चाची सुरुवात असो की समापन असो. याचे मुख्य केंद्र संविधान चौकच आहे. या मार्गाने शहरभर जाणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com