नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :- सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी, नवी मुंबई येथे काढले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-295 एअरक्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-30 एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुरलीधर मोहोळ, नागरी उड्डाण राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. त्यानंतर सिडको प्रदर्शन केंद्र, वाशी, नवी मुंबई येथे पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिडकोच्या 26 हजार 502 सदनिकांच्या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ, महाराष्ट्र भवन, नैना नगर रचना परियोजना 8 ते 12 मधील पायाभूत सुविधा विकास कामे, ठाणे नागरी पुनरुत्थान योजना (नवीन 3 हजार 833 सदनिका), पश्चिम परिघीय (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) मार्ग यांचे भूमिपूजन; 18 होल्सच्या आंतरराष्ट्रीय खारघर व्हॅली गोल्फ कोर्स व सेंटर ऑफ एक्सलन्स येथील दर्शक गॅलरी यांचे उद्घाटन आणि ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी संजय शिरसाट, अध्यक्ष, सिडको, श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, मावळ, नरेश म्हस्के, लोकसभा सदस्य, ठाणे, निरंजन डावखरे, विधानपरिषद सदस्य, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानपरिषद सदस्य, गणेश नाईक, विधानसभा सदस्य, ऐरोली, प्रशांत ठाकूर, विधानसभा सदस्य, पनवेल, मंदा म्हात्रे, विधानसभा सदस्य, बेलापूर, महेश बालदी, विधासभा सदस्य, उरण, विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, दिलीप ढोले, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांसह सिडकोतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विमानांच्या यशस्वी लॅंडिंग व फ्लायपास्टकरिता सिडको व अन्य संबंधितांचे अभिनंदन केले. सिडकोच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर प्रकल्पांद्वारे मुंबई महानगर प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडवून आणण्याची व महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ईर्शाळवाडी दरडग्रस्तांकरिता कमी कालावधीत घरे बांधून सिडकोने मानवता जपली असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

याप्रसंगी ईर्शाळवाडी पुनर्वसन प्रकल्पातील दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ईर्शाळवाडी दरडग्रस्तांपैकी सिडकोमध्ये कंत्राटी स्वरूपावर नियुक्ती देण्यात आलेल्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. तसेच सिडकोच्या विविध प्रकल्पांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विजय सिंघल यांनी सिडकोच्या प्रकल्पांविषयी संक्षिप्त माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांचा आढावा

Sat Oct 12 , 2024
– जुन्नर-तळेघर आणि भीमाशंकर-राजगुरुनगर रस्त्यांच्या विकासासह अन्य प्रमुख प्रकल्पांचे मूल्यांकन नवी दिल्ली :- पंतप्रधान गतिशक्ती उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना चालना देण्यासाठी नेटवर्क नियोजन गटाची (एनपीजी) 81 वी बैठक उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) विभागाचे अतिरिक्त सचिव, राजीव सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत पाच महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले, ज्यात महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे रस्ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com