कमी खर्चात निसर्ग, धार्मिक पर्यटन, एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ योजना

नागपूर :-एसटी महामंडळाचा चार किंवा सात दिवसांचा पास घ्या आणि राज्यात कोठेही आणि कितीही वेळा प्रवास करा. अतिशय कमी पैशांत एसटीची ‘आवडेल तेथे प्रवास’ सवलत योजनेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे आणि खाजगी ट्रॅव्हलिंग कंपन्यांची स्पर्धा असतानाही ही योजना प्रभावी ठरू पाहत आहे. या योजनेमुळे प्रवासी, विशेष पर्यटकांसाठी सोईचे झाले आहे.

कमी खर्चात निसर्ग व धार्मिक पर्यटन करता यावे, यासाठी एसटी महामंडळाने ‘आवडेल तेथे प्रवास’ ही सवलत योजना सुरू केली आहे. एसटीचा महसूल वाढावा, प्रवाशांशी नाते प्रस्थापित व्हावे असाही या योजनेमागचा हेतू आहे. या योजनेला नागपूर विभागातही चांगला प्रतिसाद मिळत असून, डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत 16 लाखांचे उत्पन्न मिळाले.

चार आणि सात दिवसांची ही योजना आहे. चार दिवसांसाठी पास घ्यायचा असल्यास साध्या बससाठी 1170, तर शिवशाहीसाठी 1520 रुपये लागतात. तसेच सात दिवसांसाठी साध्या बसचे 2040, तर शिवशाहीसाठी 3030 रुपये लागतात. पास काढल्यानंतर योजनेंतर्गत संबंधित कालावधीत राज्यात कोठेही आणि कितीही वेळा प्रवास करता येतो. पर्यटन, विविध धार्मिक स्थळे तसेच नातेवाईकांच्या गावाला जाणार्‍या कुटुंबे या योजनेतील पासेसची बुकिंग करू लागले आहेत.

उन्हाळा, नाताळ आणि लग्नसराईत या पासेसना चांगला प्रतिसाद मिळतो. तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर, गणपतीपुळे, जेजुरीसारख्या धार्मिक ठिकाणी आणि कोकणपट्टी, महाबळेश्वरसारख्या निसर्ग पर्यटनासाठी पास प्रामुख्याने काढला जातो. एकीकडे एसटी भाडे जास्त होत असल्याने चार दिवसाला 1170 रुपये खर्चून महाराष्ट्रात कोठेही फिरणे पर्यटकांना परवडण्यासारखे आहे.

योजनेला उत्तम प्रतिसाद

‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चार दिवसांच्या पासेसला प्राधान्य दिले जाते. प्रवाशांनी योजनेचा लाभ घ्यावा.

प्रल्हाद घुले, विभागीय नियंत्रक -एसटी महामंडळ

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com